आचार्य विद्यासागर महाराजांसह सर्व मुनिगण स्वस्थ, दर्शनासाठी आलेले ५० भाविक संक्रमित आढळल्याने उडाली होती खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2020 06:09 AM2020-09-05T06:09:41+5:302020-09-05T06:09:47+5:30
काही दिवसांपूर्वी रेवती रेंजमध्ये ५० हून अधिक कोरोना संक्रमित सापडल्यानंतर येथे खळबळ उडाली होती. आचार्य विद्यासागर महाराजांचे दर्शन घेण्यासाठी देशाच्या विभिन्न भागांतून भाविकांची गर्दी वाढतहोती.
- मुकेश मिश्रा
इंदूर : दिगंबर जैन संत आचार्य विद्यासागर महाराज आणि संघस्थ सर्व मुनिगण स्वस्थ आहेत. चातुर्मास स्थळ प्रतिभा स्थली, रेवती रेंजमध्ये कोणत्याही भक्तास प्रवेशास पूर्णपणे बंदी घातली गेली आहे. तपासणीनंतर केवळ पाच कुटुंबीयांनाच थांबण्याची परवानगी देण्यात आली आहे. आचार्यश्री व मुनिगणांच्या आरोग्याचा विचार करता प्रशासन आणि ट्रस्टने सजगता बाळगली आहे.
काही दिवसांपूर्वी रेवती रेंजमध्ये ५० हून अधिक कोरोना संक्रमित सापडल्यानंतर येथे खळबळ उडाली होती. आचार्य विद्यासागर महाराजांचे दर्शन घेण्यासाठी देशाच्या विभिन्न भागांतून भाविकांची गर्दी वाढतहोती.
दरम्यान, दिल्ली येथून आलेल्या एका कुटुंबातील सदस्यांची प्रकृती अचानक बिघडली. आरोग्यविषयक तपासणी केल्यानंतर संबंधित व्यक्ती कोरोनाग्रस्त आढळून आले. आजारी सदस्यांसोबत हे कुटुंब नंतर दिल्लीला परतले. परंतु, त्या कुटुंबीयांच्या संपर्कात आलेल्या लोकांची तपासणी करण्याचा निर्णय ट्रस्टने घेतला आणि तपासात ५०हून अधिक लोकांना संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले. प्रशासनाने सर्व रुग्णांना आयसोलेशनमध्ये पाठवले आहे. तसेच संपूर्ण चातुर्मास स्थळाला निर्जंतूक करण्यात आले आहे.
घेतली जात आहे सुरक्षेची काळजी
चातुर्मास स्थळावर आचार्यश्री यांच्यासोबतच अन्य १३ साधुगण उपस्थित असल्याचे दयोदय चॅरिटेबल ट्रस्टचे महामंत्री संजय मैक्स यांनी सांगितले. या सगळ्यांची व्यवस्था वेगवेगळ्या खोल्यांमध्ये करण्यात आली असून, ते निरंतर ध्यान आणि स्वाध्याय साधनेत मग्न
असतात.
आहारचर्या आणि दैनिक क्रियांसाठीच ते खोलीच्या बाहेर येत असतात. त्यांना आहार देणारे श्रावकही त्यांच्यापासून दोन ते तीन फूट अंतरावर असतात. आचार्यश्री आणि मुनी संघाच्या आरोग्याचा विचार करता सुरक्षेच्या दृष्टीने सर्वच उपाययोजनांची अंमलबजावणी प्राधान्याने केली जात आहे.