-पोपट पवार
देशातील सर्वांत लहान मतदारसंघ म्हणून ओळखले जाणारे लक्षद्वीपचे बेट आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी काँग्रेस, भाजपा, राष्ट्रवादी व जेडीयूनेही कंबर कसली आहे. मात्र, मुस्लिमांचे प्राबल्य असलेल्या या बेटावर काँग्रेस व राष्ट्रवादी या दोन मित्रपक्षांमध्येच लढत होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात आघाडी करणारे हे दोन्ही पक्ष लक्षद्वीपमध्ये आमने-सामने येणार असल्याचे दिसत आहे.अनुसूचित जातीसाठी राखीव व जेमतेम ५० हजार मतदार असलेल्या लक्षद्वीप मतदारसंघात गेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या मोहम्मद फैजल यांनी काँग्रेसच्या मोहम्मद हमदुल्ला सईद यांच्यावर निसटता विजय मिळवला होता. मात्र सलग १0 वेळा काँग्रेसच्या पी. एम. सईद यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. सईद यांच्या विक्रमामुळेच हा मतदारसंघ देशभर चर्चेत होता. लक्षद्वीप मतदारसंघहा सुरुवातीपासून काँग्रेसचा बालेकिल्ला आहे.आतापर्यंत १२ वेळा इथेकाँग्रेसने विजय मिळवला आहे. मात्र, २००४ मध्ये जनता दलाच्या पी. पुकुन्ही कोया यांनी पी. एम. सईद यांचा अवघ्या ७१ मतांनी पराभव करून, काँग्रेसच्या या गडाला सुरुंग लावला. त्यानंतरच्या २००९ च्या लोकसभा निवडणुकीत मात्र काँग्रेसने मागील चुका सुधारून, पुन्हा लक्षद्वीपवर सत्ता काबीज केली. पी. एम. सईद यांचे चिरंजीव मोहम्मद हमदुल्ला सईद हे विजयी होते.या मुस्लीमबहुल मतदारसंघात यंदा काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच मुख्य लढत होत असली, तरी जनता दल (युनायटेड), मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षांनीही हा मतदारसंघ घेण्यासाठी कंबर कसली आहे. विशेष म्हणजे गेल्या निवडणुकीत अवघी १८७ मते पदरात पडलेल्या भारतीय जनता पार्टीनेही इथे कमळ फुलविण्याची महत्त्वाकांक्षा उराशी बाळगली आहे. त्यासाठी भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी तीन दिवस तळ ठोकून, लक्षद्वीप बेटाला वळसा घातला.अंदमान-निकोबार, दादरा व नगर-हवेली, दीव-दमण, लक्षद्वीप आणि पाँडेचेरी या केंद्रशासित प्रदेशांत लोकसभेची प्रत्येकी एक जागा आहे. मात्र, कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळण्याची चर्चा अससल्याने काँग्रेस, भाजपसह सर्वच प्रादेशिक पक्षांनी एकेका जागेसाठी प्रतिष्ठा पणाला लावली आहे.अंदमान-निकोबार बेटे देशाच्या मुख्य भूमीपासून लांब असली,तरी इथे दिल्लीतील राजकीय घडामोडीचे पडसाद मात्र लगेच उमटतात. एकूण ५७२ बेटांमध्ये विखुरलेल्या या केंद्रशासित प्रदेशात दोन लाख ७० हजार मतदार आहेत.गेल्या निवडणुकीत या दोन पक्षांबरोबरच तृणमूल काँग्रेस, डावे पक्ष, बहुजन समाज पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस, आम आदमी पार्टी, समाजवादी पक्षाचे उमेदवार रिंगणात होते; पण मुख्य लढत भाजप- काँग्रेसमध्येच झाली. यात भाजपाचे बिष्णुपद रॉय विजयी झाले. त्यांना काँग्रेसच्या कुलदीप रॉय शर्मा यांनी कडवी लढत दिली.काँग्रेसच्या मनोरंजन भक्त यांनी आठ वेळा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते. गेल्या दोन निवडणुकांत ही जागा भाजपाने आपल्याकडे कायम राखली. यावेळीही पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्येच लढत होण्याची चिन्हे आहेत.राष्ट्रवादीची मनधरणी करण्याचा प्रयत्नगेल्या लोकसभा निवडणुकीत मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या मोहम्मद फैजल यांनी हा मतदारसंघ काँग्रेसकडून ताब्यात घेतला. होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीतही काँग्रेसकडून मोहम्मद हमदुल्ला सईद, तर राष्ट्रवादीकडून मोहम्मद फैजल यांचीच उमेदवारी निश्चित मानली जात आहे. संयुक्त पुरोगामी आघाडीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादीने येथे उमेदवार उभा करू नये यासाठी काँग्रेसकडून प्रयत्न सुरू आहेत. मात्र, काँग्रेसचा हा प्रस्ताव राष्ट्रवादी मान्य करील असे दिसत नाही. गेल्या निवडणुकीच्या वेळीही या दोन्ही पक्षांत याच मुद्यांवरून तणातणी झाली होती.