आग्रा - फतेहपूर सिकरी येथे 22 ऑक्टोबरला स्विर्त्झलँडमधील जोडप्याला मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी 5 आरोपींना अटक केली आहे. उत्तर प्रदेशचे डीजीपी सुलखान सिंह या प्रकरणासंबंधी ट्विट करत माहिती दिली की, चौकशीदरम्यान पाच आरोपींचा या घटनेत समावेश असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर सर्व पाच आरोपींना अटकही करण्यात आली आहे. यातील तीन आरोपी हे अल्पवयीन असल्याची प्राथमिक माहितीदेखील समोर आली आहे.
दरम्यान, अटक करण्यात आलेल्या पाच जणांच्या हल्ल्यात परदेश पर्यटक क्युन्टीन जेर्मी क्लॉर्क हे गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर अपोलो हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. पण गुरुवारी त्यांना डिस्जार्च देण्यात आला आहे.
नेमकी आहे घटना?
भारत भ्रमंती करण्यासाठी आलेल्या स्विर्त्झलँडमधील प्रेमी युगुलाला उत्तर प्रदेशातील फतेहपूर सिकरी येथे एका वाईट परिस्थितीचा सामना करावा लागला. फतेहपूर सिकरी येथे काही जणांच्या टोळक्यानं या परदेशी जोडप्यावर दगड आणि लाठ्याकाठ्यांनी हल्ला केला. रविवारी (22 ऑक्टोबर) ही घटना घडली आहे. रक्तानं माखलेले हे परदेशी पर्यटक रस्त्यावर पडले होते आणि येणारी-जाणारी लोकं मात्र त्यांचा व्हिडीओ रेकॉर्ड करण्यात व्यस्त होते. दरम्यान, परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी परदेशी पर्यटकांना करण्यात आलेल्या मारहाणी प्रकरणावर नाराजी व्यक्त केली आहे आणि राज्य सरकारला उत्तरासहीत अहवाल सादर करायला सांगितले आहे. शिवाय, परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिका-यांना हॉस्पिटलमध्ये जाऊन पर्यटकांची भेट घेण्यासही सांगितले आहे. दरम्यान, याप्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.
मेरी द्रोज आणि क्युन्टीन जेर्मी क्लॉर्क असे मारहाण झालेल्या परदेशी पर्यटकांचं नाव आहे. 30 सप्टेंबरला मैत्रीण मेरी द्रोजसोबत भारतात आलेले क्युन्टीन जेर्मी क्लॉर्क सध्या दिल्लीतील एका हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. मारहाण प्रकरणाबाबत त्यांनी सांगितले की, ''रविवारी (22 ऑक्टोबर) फतेहपूर सिकरी रेल्वे स्टेशन परिसरात फिरत असताना, यादरम्यान काही तरुणांच्या घोळक्यानं त्यांचा पाठलाग करायला सुरुवात केली. सुरुवातीला त्या घोळक्यानं काहीतरी टिप्पणी केली, पण आम्हाला काहीही समजलं नाही. त्यानंतर सेल्फी घेण्यासाठी त्यांनी आम्हाला जबरदस्तीनं रोखून ठेवलं''.
परदेशी पर्यटकांना त्रास देण्याच्या या प्रकाराचं काही वेळानं हाणामारीमध्ये रुपांतर झाले. पाठलाग करणा-या या घोळक्यानं क्लॉर्कचं डोकंच फोडलं. दरम्यान, या मारहाणीमुळे क्लॉर्क यांना एका कानानं कमी ऐकू येणार असल्याचं त्यांच्यावर उपचार करणा-या डॉक्टरांनी सांगितले आहे. मेरीदेखील या हल्ल्यात जखमी झाली आहे.
''हल्ल्यानंतर आम्ही रक्तानं माखलेल्या अवस्थेतच रस्त्यावरच पडलो होतो आणि येणारी-जाणारी लोकं आम्हाला मदत करण्याऐवजी मोबाइलवर आमचा व्हिडीओ रेकॉर्ड करण्यात व्यस्त होती'', अशी नाराजीही क्लॉर्कनं यावेळी व्यक्त केली. क्लॉर्क पुढे असेही म्हणाले की,''विरोध केल्यानंतर त्या घोळक्यानं आमचा पाठलाग करणं थांबवलं नाही. आमचे फोटो घेत होते, एवढंच नाही तर मेरीच्या जवळ जाण्याचाही प्रयत्न करत होते. त्यांना आम्हाला कुठेतरी घेऊन जायचे होते. मात्र विरोध केल्यानंतर त्यांनी आम्हाला दगड-लाठ्या-काठ्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली''.