जयपूर : मुलगी हे वरदान असल्याची घटना राजस्थानमध्ये घडली आहे. तेथील हनुमानगढ या जिल्ह्यातील शेतकऱ्याच्या पाचही मुली राजस्थान प्रशासकीय सेवेमध्ये अधिकारी बनल्या आहेत. त्यातील तीन मुलींची काही दिवसांपूर्वी एकाच वेळी अधिकारपदी निवड झाली, तर दोन मुली याआधीच अधिकारी बनल्या आहेत.
हनुमानगढ जिल्ह्यातील भेरुसरी गावात राहणारे शेतकरी सहदेव सहारण यांना पाच मुली आहेत. त्यातील रोमा, मंजू या दोन मुली याआधीच राजस्थान प्रशासकीय सेवेमध्ये अधिकारी म्हणून रूजू झाल्या आहेत, तर आणखी तीन मुली अंजू, सुमन व ऋतुका याही प्रशासकीय सेवेच्या परीक्षेला बसल्या होत्या. त्यात उत्तीर्ण या तिघींची एकाच वेळी अधिकारी म्हणून निवड होण्याची आगळी घटना घडली आहे.
सहदेव सहारण यांची एक मुलगी बीडीओ आहे, तर दुसरी मुलगी सहकार खात्यात अधिकारी आहे. आता त्यांच्या आणखी तीन मुली अधिकारी बनणार असल्याने सहदेव व त्यांची पत्नी यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. आपल्या मोठ्या बहिणी सरकारी अधिकारी बनल्या होत्या. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन अंजू, सुमन व ऋतुका या धाकट्या बहिणींनीही प्रशासकीय सेवेच्या परीक्षेसाठी अभ्यास सुरू केला होता. अफाट मेहनत घेऊन केलेल्या अभ्यासामुळे त्याही परीक्षा उत्तीर्ण झाल्या. एकाच वेळी त्यांनी परीक्षा दिली व यश मिळविले.
शेतकरी कुटुंबाचे करणार भव्य स्वागत
एका शेतकऱ्याच्या पाचही मुलींनी सरकारी अधिकारी बनणे, ही घटना दुर्मीळ आहे. त्याचा हनुमानगढ जिल्ह्यातील रहिवाशांना मनापासून आनंद झाला आहे. सहारण कुटुंबीय सध्या कामानिमित्त काही दिवसांसाठी जयपूर येथे आले असून, ते जेव्हा हनुमानगढला घरी परततील तेव्हा त्यांचे भव्य स्वागत करण्यात येणार आहे.