कानपूर : आपल्या देशात अशा अनेक गूढ जागा आहेत ज्यांचा अद्याप रहस्यभेद झालेला नाही. हे भुयार त्यापैकीच एक. उत्तर प्रदेशच्या फतेहपूर जिल्ह्यातील या भुयाराला लोक ‘बर्म्युडा ट्रँगल’ची उपमा देतात. कारण, जो त्यात गेला तो आजपर्यंत परत आलेला नाही. बागबादशाही नावाचे हे भुयार ३५० वर्षे जुने असून, औरंगजेबाने ते तयार केले होते. खजुहा गावात आजही ते अस्तित्वात आहे. या भुयारात चुकूनही कोणी गेला तर तो परत येत नाही, असे खजुहा गावचे लोक सांगतात. ‘एकदा गावात लग्नसोहळा होता. वऱ्हाडातील लोक मोठ्या संख्येने भुयार पाहण्यासाठी आत गेले. मात्र, ते परत आले नाहीत’, असे हर्षित वाजपेयी यांनी सांगितले. हे भुयार कोलकात्याहून पेशावरपर्यंत जाते, असे बृजबिहारी वाजपेयी यांचे म्हणणे आहे. तज्ज्ञांच्या मते तेव्हा येथे शाहजहाँचा मुलगा शाहशुजा याचे राज्य होते. औरंगजेबाने हा परिसर काबीज करण्यासाठी अनेकदा आक्रमणे केली. मात्र, प्रत्येकवेळी त्याचा पराभव झाला. ५ जानेवारी १६५९ रोजी औरंगजेबाने पुन्हा हल्ला केला आणि यावेळी त्याने विजयश्री मिळवली. या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठीच औरंगजेबाने हे भुयार तयार केले होते. बागबादशाहीच्या पूर्वेकडे तीन मीटर उंच चबुतरे आणि २ बारादरी आहे. यात मोठ्या खोल्या तयार करण्यात आल्या होत्या. बारादरीसमोर सुंदर तलावही होता. बागबादशाहीच्या मधोमध एक विहीरही आहे.
अख्खे वऱ्हाड झाले होते बेपत्ता
By admin | Published: March 04, 2017 4:45 AM