लखनौ- भारतात १५ ऑगस्टला संपूर्ण देश ७५ वा स्वातंत्र्यदिन जल्लोषात साजरा करत होता. त्याचदिवशी अफगाणिस्तानात मोठा हिंसाचार सुरु होता. तालिबाननंअफगाणिस्तानवर(Afghanistan) कब्जा केला. राजधानी काबुल ताब्यात घेतल्यानंतर तालिबानींनी संसद, राष्ट्रपती भवनावर कब्जा केला. तालिबाननं अफगाणिस्तानवर कब्जा मिळवल्यानंतर संपूर्ण जगात खळबळ माजली आहे.
दुसरीकडे तालिबानींचं कौतुक करण्यासाठीही अनेकजण पुढे येत आहेत. समाजवादी पक्षाचे खासदार शफीकुर्रहमान यांच्यानंतर आता ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाचे प्रवक्ते मौलाना सज्जाद नोमानी यांनीही तालिबानचं समर्थन करणारं विधान केले आहे. तालिबानीच्या हिंमतीला सलाम करत सर्वात ताकदवान असलेल्या सैन्याला मात देण्याचं कौतुक मौलाना सज्जाद नोमानी यांनी केले आहे. त्यांच्या या विधानानंतर अनेकांनी टीका केली आहे.
मौलाना सज्जाद नोमानी म्हणाले की, पुन्हा एकदा ही तारीख इतिहासात नोंदवली जाईल. एका दुर्लक्षित गटानं सर्वात मोठ्या फौजेला मात दिली. काबुलच्या महालात ते दाखल झाले. काबुलमध्ये त्यांची उपस्थिती अख्ख्या जगानं पाहिली. त्यांच्यात ना कोणता अहंकार होता ना घमंड आहे. मोठी वार्ता नाही. ते नवयुवक काबुलच्या धरतीवर आले. त्यांचे अभिनंदन. तुमच्यापासून दूर असलेला हिंदी मुसलमान तुम्हाला सलाम करतो. तुमच्या धाडसाला सलाम करतो. तुमच्या कर्तृत्वाला सलाम करतो असं त्यांनी सांगितले.
सपा खासदाराविरोधात गुन्हा दाखल
यापूर्वी समाजवादी पक्षाचे खासदार शफीकुर्रहमान यांनी अफगाणिस्तानात तालिबानने कब्जा मिळवल्याची तुलना भारताच्या ब्रिटीश राजवटीशी केली आहे. हिंदुस्तान जेव्हा इंग्रजांच्या राजवटीत होता तेव्हा त्यांना हटवण्यासाठी आम्ही संघर्ष केला. त्याचरितीने तालिबानने त्यांच्या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं आहे. या संघटनेने रशिया, अमेरिकेसारख्या ताकदवान देशांना त्यांच्या देशात थांबू दिलं नाही असं सांगत त्यांनी तालिबानींचे कौतुक केले.
पोलिसांनी समाजवादी पक्षाचे खासदार शफीकुर्रहमान यांच्याविरोधात विविध गुन्ह्याखाली कारवाई केली आहे. मागील काही दिवसांपासून अफगाणिस्तान सरकारला हटवून तालिबानने सत्ता काबीज केली. अमेरिकेने त्यांचे सैन्य परत बोलावण्याचा निर्णय घेतल्यानंतर अफगाणिस्तानात अनेक ठिकाणी हिंसाचार घडला. निष्पाप जीव गेले. अफगाणी नागरीक देश सोडून अन्य देशात पलायन करु लागले.