श्रीनगर - जम्मू काश्मीरमधील कलम 370 हटविल्यानंतर पाकिस्तानकडून भारतामध्ये कुरापती करण्याच्या हालचाली वाढल्या आहेत. काश्मीर खोऱ्यातील शांतता बिघडविण्यासाठी पाकचे दहशतवादी मोठा हल्ला करण्याच्या तयारीत असल्याची अधिकृत माहिती सरकारला प्राप्त झाली आहे.
दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर काश्मीरमध्ये भारतीय लष्कर, हवाई दल आणि सुरक्षा यंत्रणांना हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांपासून इंटरनेट, फोनसेवा या गोष्टींवर निर्बंध लावण्यात आले आहेत. आज प्रशासनाकडून काही ठिकाणच्या सेवांवरील निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. सोमवारपासून रस्त्यावर पर्यटकांच्या गाड्यांचीही रेलचेल सुरु होईल. गेल्या 12 दिवसांत कुठेही हिंसाचाराच्या घटना घडल्या नाहीत अशी माहिती प्रशासनाने दिली.
मात्र सीमेपलीकडून होणाऱ्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेण्याचं सुरु आहे. शुक्रवारी नमाजानंतरही राज्यातील स्थिती सर्वसामान्य होती. सरकारी कार्यालये उघडली गेली आहेत. सोमवारपासून शाळा-कॉलेज उघडतील. राज्यातील 22 पैकी 12 जिल्ह्यांमध्ये जनजीवन सुरळीत सुरु आहे असं प्रशासनाकडून सांगण्यात आलं.
जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा भारताकडून रद्द करण्यात आल्यानंतर पाकिस्तानचा तीळपापड झाला. हा मुद्दा आंतरराष्ट्रीय पातळीवर उपस्थित करण्यासाठी पाकिस्ताननं हरतऱ्हेचे प्रयत्न केले. काश्मीरचा विशेष दर्जा काढल्यानं आणि त्याला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा दिल्यानं दहशतवादाचा अजेंडा राबवणं कठीण जाईल असं पाकिस्तानला वाटतं. त्यामुळेच चीनच्या मदतीनं काश्मीरचा मुद्दा आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्याचे प्रयत्न पाकिस्तानकडून सुरू होते. अखेर चीननं याबद्दल बैठक घेण्याची मागणी केली.
तर दुसरीकडे भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पोखरणमध्ये मोठं विधान केलेले आहे. आजपर्यंत भारताने कधीही अणवस्त्राचा वापर पहिल्यांदा केला नाही पण भविष्यात काय घडेल ते तेव्हाच्या परिस्थितीवर निर्भर आहे असं विधान संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी एका कार्यक्रमात केलं आहे. त्यामुळे काश्मीर खोऱ्यात शांतता राखण्यासाठी केंद्र सरकारकडून सुरक्षा यंत्रणांना अलर्ट केलं आहे.
दरम्यान हे जग काश्मीरमध्ये मुस्लिमांवर होणारा अन्याय बघत राहणार का? जिहादच्या नावाखाली पाकिस्तानकडून जगातील अन्य देशांना घाबरविण्याचा प्रकार सुरु झाला आहे. जर जगाने काश्मीर प्रश्नी वेळीच लक्ष दिलं नाही तर त्याचे परिणाम गंभीर होतील, त्याचे पडसाद जगातील मुस्लिमांवर होऊन कट्टरता वाढेल आणि हिंसाचाराला सुरुवात होईल असा इशारा पाकच्या पंतप्रधानांनी दिला आहे.