जम्मू: पाकिस्तानने बळकावलेले काश्मीर परत मिळविण्यासाठी आडवर काहीही केले गेले नसले तरी काश्मीरचा प्रश्न सोडविण्यासाठी पाकिस्तानशी चर्चा करणे हाच एकमेव मार्ग आहे, असे आग्रही प्रतिपादन जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री व नॅशनल कॉन्फरन्सचे ज्येष्ठ नेते डॉ. फारुख अब्दुल्ला यांनी शनिवारी येथे केले.पाकिस्तानने व्यापलेले काश्मीर त्यांच्याकडेच राहणार आहे व भारताकडील काश्मीर आपल्याकडे राहणार आहे, या डॉ. अब्दुल्ला यांच्या विधानाने शुक्रवारी वादंग माजले होते. तेच सूत्र पकडून शनिवारी येथे एका कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले: पाकव्याप्त काश्मीर आणि जम्मू-काश्मीर कधीच एक होऊ शकणार नाहीत, हे मी राजकारणात आल्यापासून सांगत आलो आहे. पाकिस्तानच्या ताब्यातील काश्मीर परत मिळविण्याची ताकद आपल्यात नाही व आपले काश्मीर घेण्याचे बळ पाकिस्तानात नाही. आपल्याप्रमाणे तोही (पाकिस्तान) एक अण्वस्त्रधारी देश आहे.लष्कर तरी आपले किती संरक्षण करू शकेल. सर्व सैन्य जरी मदतीला आले तर ते दहशतवादी आणि बंडखोरांपासून आपला बचाव करू शकणार नाहीत. त्यामुळे (पाकिस्तानशी) चर्चा करून मार्ग काढणे हाच एकमेव पर्याय शिल्लक राहतो, यावर त्यांनी भर दिला.अटल बिहारी बाजपेयी पंतप्रधान असताना काश्मीर समस्या सुटू शकेल, याविषयी मला आशा होती. पण तसे झाले नाही, असेही डॉ. अब्दुल्ला म्हणाले. पाकिस्तान व भारताने आपापल्या ताब्यातील काश्मीरचे भाग कायमसाठी स्वत:कडे ठेवणे हा अंतिम तोडगा आहे, असे मी कधीच म्हटलेले नाही. बहुसंख्य भारतीयांना, पाकिस्तानींना व जम्मूृकाश्मीरवासियांना मान्य होईल असा याहूनही चांगला तोडगा असेल तर तोही आम्हाला मान्य होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.पाकव्याप्त काश्मीर हा पाकिस्तानचा भाग असल्याचे म्हटल्याबद्दल डॉ. अब्दुल्ला यांनी माफी मागावी,अशी मागणी भाजपाने केली असून राजकारणात टिकून राहण्यासाठी ते मुद्दाम असे विषय उकरून काढत असल्याचा आरोप केला आहे.(वृत्तसंस्था)
सर्व सैन्य लावले तरी दहशतवाद पुरून उरेल - फारुख अब्दुल्ला
By admin | Published: November 29, 2015 3:33 AM