नवी दिल्ली : केंद्रीयमंत्री गिरीराज सिंह यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. पुर्णिया येथे गुरुवारी माध्यमांशी बोलताना, देशातील सर्व मुस्लिमांना 1947 मध्येच पाकिस्तानला पाठवून द्यायला हवं होतं, असं त्यांनी म्हटले. जेएनयू विद्यार्थी परिषदेचा माजी अध्यक्ष कन्हैया कुमार दौऱ्यावर असलेल्या जिल्ह्यांमध्ये गिरीराज सिंह सध्या दौरा करत आहेत.
देशात नागरिकता संशोधन कायद्याच्या आडून भारत विरोधी अजेंडा राबविण्यात येत आहे. नागरिकता संशोधन कायद्यासंदर्भात पाकिस्तान जी भाषा बोलत आहे, तीच भाषा काँग्रेस, जेडीयू आणि कम्युनिस्ट बोलत असल्याचे गिरीराज सिंह यांनी सांगितले. दिल्लीतील शाहीन बागेत शरजील इमाम म्हणतो की, आम्ही इस्लामीक स्टेट बनवू आणि भारताची विभागणी करू तेव्हा शाहीन बागचे आंदोलन हे लोकशाही मार्गाने नव्हे तर खिलाफत आंदोलन होत, असल्याचे गिरीराज म्हणाले.
दरम्यान अलिगढ मुस्लीम विद्यापीठाचा विद्यार्थी म्हणतो की, जो आमच्या धर्माशी पंगा घेईल तो नष्ट होईल. हैदराबादमध्ये तर सीएए मागे न घेतल्यास आम्ही शांत बसणार नाही, भारताचे तुकडे-तुकडे करू असं म्हणतात. त्यामुळे देशातील नागरिकांना देशासाठी समर्पण करण्याची वेळ आल्याचे गिरीराज सिंह यांनी सांगितले. यावेळी त्यांनी भारत स्वातंत्र्याची आणि फाळणीची आठवण करत, 1947 मध्येच सर्व मुस्लिमांना पाकिस्तानात पाठवून द्यायला हवं होतं, असं म्हटले. त्यावेळी आपले पूर्वज स्वतंत्र्यासाठी लढा देत होते. तर जीना इस्लामिक स्टेट बनविण्यासाठी प्रयत्न करत होते, असंही त्यांनी नमूद केले.