नवी दिल्ली : डिसेंबर २०१२ मध्ये दिल्लीत एका धावत्या बसमध्ये ‘निर्भया’ या तरुणीवर पाशवी बलात्कार करून तिचा खून करणाऱ्या चारही सिद्धदोष गुन्हेगारांच्या बहुप्रतीक्षित फाशीसाठी येत्या २२ जानेवारीचा दिवस मंगळवारी ठरविण्यात आला.हा मूळ खटला जेथे चालला होता, त्या पतियाळा हाउस न्यायालयातील अतिरिक्त सत्र न्यायाधीश सतीश कुमार अरोरा यांनी मुकेश (३१ वर्षे), पवन गुप्ता (२४), विनय शर्मा (२५) आणि अक्षय कुमार सिंग (३३) या चौघांविरुद्ध फाशीसाठीचे ‘डेथ वॉरंट’ जारी केले. त्यानुसार येत्या २२ जानेवारीस सकाळी ७ वाजता तिहार कारागृहात त्यांना फाशी दिले जाईल.डेथ वॉरंट काढले, तेव्हा चौघेही गुन्हेगार न्यायालयात हजर नव्हते. ‘व्हिडीओ कॉन्फरन्सिंग’द्वारे तुरुंगात त्यांना याची माहिती देण्यात आली. या डेथ वॉरंटविरुद्ध कायदेशीर दाद मागायची असल्यास पुढील १४ दिवसांत तुम्ही ती मागू शकता, असे न्यायाधीश अरोरा यांनी चौघाही गुन्हेगारांना सांगितले.गुन्ह्यानंतर नऊ महिन्यांमध्ये जलदगती न्यायालयाने १३ गुन्ह्यांसाठी दोषी ठरवून चौघांना फाशीची शिक्षा ठोठावली होती. पुढे उच्च वसर्वोच्च न्यायालयानेही तीच शिक्षा कायम केली. त्याविरुद्ध अरोपींनी केलेल्या फेरविचार याचिका जुलै व डिसेंबरमध्ये फेटाळल्यानंतरत्यांच्या फाशीचा मार्ग मोकळा झाला.आता कोणतीही कायदेशीर अडचण नसल्याने लवकरात लवकर फाशी दिली जावी, यासाठी ‘निर्भया’च्या पालकांनी सत्र न्यायालयात अर्ज केला होता. या सर्व आरोपींना सर्वोच्च न्यायालयात ‘क्युरेटिव पीटिशन’ करता येईल. ते दयेचा अर्जही करू शकतात. ती कारवाई होईपर्यंत ‘डेथ वॉरंट’ काढू नये, अशी विनंती या सर्व आरोपींच्या वतीने करण्यात आली. मात्र क्युरेटिव पीटिशन व दयेचे अर्ज डेथ वॉरंट निघाल्यानंतरही करता येतात, असे सांगून सरकारी वकिलांनी आणखी विलंब करण्यास विरोध केला.>‘माझ्या मुलीला न्याय मिळाला’‘डेथ वॉरंट’ निघाले तेव्हा ‘निर्भया’ची आई हजर होती. माझ्या मुलीला आज अखेर न्याय मिळाला. चारही खुन्यांना फासावर लटकविल्याने देशातील महिलांचे सबलीकरण होईल व लोकांचा न्यायसंस्थेवरील विश्वास दुणावेल, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. त्या म्हणाल्या की, आतापर्यंत आम्ही निर्भयाच्या तसबिरीला हार घातला नव्हता. या चौघांना फाशी होईल, तेव्हाच आम्ही तसबिरीला हार घालू.
‘निर्भया’च्या चारही खुन्यांना २२ जानेवारीस होणार फाशी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 08, 2020 6:30 AM