रमाकांत पाटील
मोरबी : ‘हमने सू पिडा थाए ते हमने मालूम, आ कले जामा एटला आसू, दबायला छे ना, जे बाहर आवे तो आख्खू गुजरात डूबी जाए...’ या वेदना आहेत कांताबेन राजेशभाई मुंछडिया या आईची. मोरबीच्या ऐतिहासिक झुलत्या पुलाचा अपघातात या मातेच्या तिन्ही मुलांचा मृत्यू झाल्याने घटनेचा महिनाभरानंतरही तिच्या हृदयातील जखमा ओल्याच आहे. सध्या विधानसभेच्या निवडणुका सुरू असल्याने राजकारणाबाबत या मृतांच्या परिवारातील लोकांमध्ये तीव्र असंतोषाची भावना धगधगत आहे.
सिरॅमिक हब म्हणून देशात प्रसिद्ध असलेल्या मोरबी विधानसभा मतदारसंघातील निवडणूक यंदा सर्वाधिक लक्षवेधी ठरली आहे. महिन्याभरापूर्वीच येथील ऐतिहासिक आणि प्रसिद्ध असलेला झुलता पूल अचानक कोसळला आणि त्यात १३५ जणांचा बळी गेला. या ठिकाणी २०१७च्या निवडणुकीत काँग्रेसचे प्रिजेसभाई मेरझा हे विजयी झाले होते. त्यांनीपुढे भाजपमध्ये प्रवेश केला आणि पोटनिवडणुकीत भाजपतर्फे विजयी झाले. मोरबीच्या घटनेमुळे भाजपने यावेळी त्यांना निवडणुकीपासून लांब ठेवले. त्यांच्या जागी कांतिलाल अमृतीया यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेसतर्फे जयंतीलाल पटेल, तर आम आदमी पार्टीतर्फे संजय भटासा हे उमेदवार आहेत.
माझा सरकारवरचा विश्वास उडालादुर्घटनेत पाण्यातून कसे बसे बाहेर निघून आपला जीव वाचविण्यात यशस्वी ठरलेली संगिता बेचरभाई परमार ही युवती पहिल्यांदाच मतदान करणार आहे. मात्र, निवडणुकीबाबत तिला छेडले असता ती सांगते, मला पुनर्जन्म मिळाला आहे, त्याचा आनंद असला तरी व्यवस्थेवर मात्र प्रचंड चीड आहे. पूल कोसळण्याची घटना ही पूर्णपणे मानवी बेपर्वाईने घडली आहे. पूल दुरुस्तीच्या दोन कोटींचा ठेका असताना ते काम व्यवस्थित केले गेले नाही, असे अनेक प्रश्न मला सतावत असून, त्यामुळे माझा सरकारवरचा विश्वास उडाला आहे.