राजेश निस्ताने, वृत्तसंपादक, नांदेडगोव्याने विविध बाबतीत आपली वेगळी परंपरा जपली आहे. जग कितीही बदलले पण त्यांचे वेगळेपण कायम आहे. निवडणुकीतील प्रचारही ते अशाच वेगळ्या पद्धतीने करतात. उमेदवार व कार्यकर्ते घराेघरी जाणार, तेथे डान्स-गाणे करून मतदारांचे लक्ष वेधणार. अनेकदा मतदारही उत्साहाने त्यात सहभागी हाेतात. सालेगावात काॅंग्रेस उमेदवाराच्या प्रचारात ‘पाण्याच तळं चूकलाे, सालेगावात केदार जिंकलाे’ या घाेषणांवरील डान्स सर्वत्र व्हायरल झाला. अशाेक चव्हाण ये लाे, केदार नाईक जिंकलो, बंबईसे आया मेरा दाेस्त, यासारख्या घाेषणा देत प्रचार करण्यात आला. सर्वच मतदारसंघात प्रचाराचा हा पॅटर्न झाला आहे. येथे विधानसभेची निवडणूक असली तरी महापालिकेतील वाॅर्डाच्या निवडणुकीचाही माहाेल पाहायला मिळत नाही. परंतु, प्रत्यक्ष मतदान हे ८० टक्क्यांच्या पुढेच राहते. गाेवेकर नागरिकांबाबत अंदाज बांधणे तसे कठीणच. येथील नागरिक निवडणुका, प्रचार यात फारसे सहभागी हाेत नाहीत. त्यामुळे उमेदवारांना ‘डाेअर टू डाेअर’ प्रचार करून मतदारांना घरीच भेटीला जावे लागते.भाजप, काँग्रेस हे प्रमुख पक्ष असले तरी इतरही पक्षांचा गाेव्याच्या निवडणुकीत बाेलबाला पाहायला मिळताे आहे. अर्धादेश ओलांडून पश्चिम बंगालमधून ममता दीदींच्या तृणमूल काँग्रेसने गाेव्यात एन्ट्री केली. परंतु गाेवेकरांसाठी सध्यातरी तृणमूल ‘नया है वह’ एवढाच मर्यादित आहे. दिल्लीतील कामगिरीच्या भरवशावर आम आदमी पक्षाने गाेवा काबीज करण्याचा प्रयत्न चालविला आहे. येथील महिला राजकीय विषयांवर कुठेच व्यक्त हाेताना दिसत नाहीत. ‘आपले काम भले अन् आपण भले’ एवढी मर्यादित दिनचर्या असूनही मतदानासाठी मात्र त्या आवर्जून हजेरी लावतात.
साधेपणा हाच दागिनासाधेपणा हा गाेव्यातील जनतेचा खरा दागिना आहे. राजकारणातदेखील हा फरक पाहायला मिळताे. या राज्यात मुख्यमंत्रीसुद्धा एखाद्या हाॅटेलसमाेर आपली मारुती-८०० कार घेऊन दोन-चार मित्रांशी गप्पा मारताना दिसतात. येथील राजकारणी इतर राज्यातील नेत्यांप्रमाणे कायम सुरक्षा कवचात वावरत नाहीत. सहज कुठेही उपलब्ध हाेतात. साधेपणाची ही संस्कृती काँग्रेस, भाजप व इतरही पक्षात पाहायला मिळते. भाजप हिंदुत्वाचा पुरस्कार करणारा पक्ष असला तरी गाेव्यात एका मर्यादेपर्यंतच त्यांनी हिंदुत्वावर जाेर दिला आहे. त्यामुळेच की काय भाजपने ४० पैकी १० ते १२ ख्रिश्चन नागरिकांना पक्षाची उमेदवारी दिली आहे. बाहेर भाजप ‘बिफ’च्या मुद्द्यावर खूप माेठा आवाज उठविते, आंदोलन करते. गाेव्यात मात्र त्यावर बाेलतानाही दिसत नाही. हाच येथील राजकारणातील मूळ फरक आहे.
‘या’ लढतींकडे राहणार लक्षमाजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांच्या पणजी या परंपरागत मतदारसंघातील लढत देशभरातच लक्षवेधी ठरली आहे. कारण भाजपने तिकीट नाकारल्याने पर्रीकरांचे पुत्र उत्पल हे अपक्ष निवडणूक लढवित आहेत. त्यांना शिवसेना-राष्ट्रवादी युतीने पाठिंबा दिला आहे. याशिवाय विद्यमान मुख्यमंत्री प्रमोद सावंत, माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, रवी नाईक, चर्चिल आलेमाव हे वेगवेगळ्या पक्षाकडून निवडणूक रिंगणात आहेत.
राजकीय घडामोडी - भाजपचे गोवा प्रभारी देवेंद्र फडणवीस यांना पक्षातील रुसवे फुगवे दूर करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. कारण येथे भाजपचे ४० पैकी २१ उमेदवार आयात केलेले आहेत.- आप आणि काँग्रेसने पक्षांतर-भ्रष्टाचार करणार नाही, अशी ‘शपथ’ उमेदवारांना घ्यायला लावली. गतवेळी १७ पैकी १० आमदार भाजपात पळून गेल्याने काँग्रेसने उमेदवारांकडून शपथपत्रच लिहून घेतले.