भाजपविरोधातील सर्व पक्षांची मोर्चेबांधणी सुरू; २३ मे रोजी दिल्लीत होणार बैठक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2019 06:16 AM2019-05-17T06:16:09+5:302019-05-17T06:17:24+5:30
निवडणूक निकालांपूर्वीच ही मोर्चेबांधणी करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अडचणीत आणण्याचा हा प्रयत्न आहे.
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळणार नाही, या शक्यतेमुळे मतमोजणीच्या दिवशी, २३ मे रोजी सोनिया गांधी यांनी भाजपबरोबर नसलेल्या आणि त्याचबरोबर यूपीएचे घटक असलेल्या सर्व पक्षांच्या नेत्यांची बैठक बोलावली आहे. निवडणूक निकालांपूर्वीच ही मोर्चेबांधणी करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अडचणीत आणण्याचा हा प्रयत्न आहे.
पहिल्या सहा टप्प्यांतील मतदान आटोपल्यानंतर भाजपला वा रालोआला स्पष्ट बहुमत मिळू शकणार नाही, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. त्यामुळे यूपीएच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्याचे ठरले. बैठकीत निवडणूक निकालांची चर्चा होईल आणि बिगरभाजप पक्षांच्या भूमिकेवर विचारविमर्ष होईल. निवडणुकीत काँग्रेसला चांगले यश मिळेल, असा विश्वास राज्यसभेतील विरोधी पक्ष नेते गुलाम नबी आझाद यांनी व्यक्त केला आहे.
या बैठकीचे निमंत्रण द्रमुकचे प्रमुख एम. के. स्टॅलिन यांना मिळाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, तेलगू देसमचे चंद्राबाबू नायडू, राष्ट्रीय जनता दलाचे तेजस्वी यादव तसेच शरद यादव, झारखंड मुक्ती मोर्चाचे नेतेही बैठकीस उपस्थित राहतील. सपचे अखिलेश यादव व बसपच्या मायावती यांच्या संपर्कात काँग्रेसचे नेते आहेत. तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी याही उपस्थित राहतील, असे दिसते.
काँग्रेसचे नेते या नेत्यांच्या संपर्कात असून, त्यांनी बैठकीला यावे, असा प्रयत्न सुरू आहे. बिजू जनता दलाचे प्रमुख व ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक, तेलंगणा राष्ट्र समितीचे अध्यक्ष व तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव, वायएसआर काँग्रेसचे प्रमुख जगन मोहन रेड्डी यांच्याशीही काँग्रेसच्या नेत्यांनी संपर्क साधला आहे. त्यांनी बैठकीला यावे, यासाठी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ चर्चा करीत आहेत.
तेलगू देसम सध्या काँग्रेसबरोबर आहे. पण तेलगू देसम व वायएसआर काँग्रेस आंध्र प्रदेशामध्ये एकमेकांचे कट्टर विरोधक आहेत. त्यामुळे जगन मोहन रेड्डी बैठकीला येणार का आणि त्यांचे येणे चंद्राबाबू नायडू यांना रुचेल का, असा प्रश्न आहे.
बहुमताने होईल पंतप्रधानपदाचा निर्णय
नरेंद्र मोदी व भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आम्हाला पंतप्रधानपद मिळाले नाही
तरी चालेल, अशी भूमिका आता काँग्रेसने घेतली आहे. भाजपला विरोध करणारे सर्व पक्ष पंतप्रधानपदाबाबत जो निर्णय घेतील, तो आम्ही मान्य करू, असे काँग्रेसने म्हटले आहे. गुलाम नबी आझाद यांनी सांगितले की, भाजप प्रणीत आघाडीला दूर ठेवणे हे आमचे लक्ष्य आहे. आमचे मित्रपत्र आमच्या बाजूने उभे राहिल्यास काँग्रेस देशाचे नेतृत्व करेल; पण काँग्रेसला पंतप्रधानपद मिळाले नाही, तरी चालेल. आम्हाला पंतप्रधानपदाची आॅफर दिली जाईपर्यंत आम्ही त्याविषयी काही बोलणार नाही, असेही आझाद यांनी स्पष्ट केले.