श्रीनगर - काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली सुरक्षा दलांची तैनाती आणि दिल्लीत सुरू असलेल्या हालचालींमुळे काश्मीरबाबत मोठा निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर आज राज्याचा विशेष दर्जा वाचवण्यासाठी काश्मीरमध्ये सर्वपक्षीय एकजूट दिसून आली. काश्मीर खोऱ्यातील परिस्थिती बिघडेल, असे पाऊल भारत आणि पाकिस्तानने उचलू नये, असे आवाहन फारुख अब्दुल्ला यांनी या बैठकीनंतर केले.
नँशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारुख अब्दुल्ला यांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीला ओमर अब्दुल्ला, पीपल्स डेमोक्रॅटिक पक्षाच्या नेत्या महेबुबा मुफ्ती यांच्यासह शाह फैसल आणि सज्जाद लोन उपस्थित होते. या बैठकीनंतर फारुख अब्दुल्ला म्हणाले की,"काश्मीरमध्ये यापूर्वी असे कधीच घडलेले नाही. काश्मीरसाठी हा सर्वात वाईट काळ आहे. यापूर्वी अमरनाथ यात्रा कधीच थांबवली गेली नाही. काश्मीर खोऱ्यात तणाव वाढेल, असे कुठलेही पाऊल भारत आणि पाकिस्तानने उचलू नये, असे आवाहन मी करू इच्छितो."
"काश्मीरला मिळालेला विशेष राज्याचा दर्जा वाचवण्यासाठी आम्ही सर्वजण एकत्र आलो आहोत. जम्मू काश्मीरमध्ये यापूर्वी कधीही एवढ्या प्रमाणात सुरक्षा दलांची तैनाती झालेली नाही. खोऱ्यातील नागरिक भीतीच्या सावटाखाली आहेत. या नागरिकांना मी एवढंच सांगू इच्छितो की धीर धरा, खोऱ्यातील शांततेचा भंग होईल, असे कुठलेही पाऊल उचलू नका", असेही ओमर अब्दुल्ला यांनी सांगितले.