भालचंद्र पेंढारकर यांची सर्व नाटके नागपुरात लोकप्रिय झाली
By admin | Published: August 11, 2015 11:16 PM
- ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र पेंढारकर यांचे निधन : शहरातील नाट्य व संगीत क्षेत्रातील मान्यवरांचा शोक
- ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र पेंढारकर यांचे निधन : शहरातील नाट्य व संगीत क्षेत्रातील मान्यवरांचा शोक नागपूर : ज्येष्ठ अभिनेते आणि गायक भालचंद्र पेंढारकर यांच्या निधनाची बातमी आल्यावर नागपुरातील नाट्य आणि संगीत क्षेत्रातील मान्यवरांनी शोक व्यक्त केला. भालचंद्र पेंढारकर यांच्या सर्वच नाटकांचे प्रयोग त्यांच्या नाटक कंपनीतर्फे शहरातील तत्कालीन धनवटे रंगमंदिरात झाले आहेत. या प्रयोगांना नागपूरकर रसिकांनी गर्दी केली होती. नागपूरकर रसिकांचे त्यांच्या कलादर्श नाटक कंपनीवरचे प्रेम पाहून पेंढारकर यांनी त्यांची सर्वच नाटके आवर्जून नागपुरात आयोजित केली होती. या नाटकांचे प्रयोग लावण्यासाठी नागपुरातील काही तत्कालीन मंडळींनी त्यांना सहकार्य केले. धनवटे रंगमंदिरात त्यांच्या नाटकांचे प्रयोग आयोजित होत असत आणि त्यांचे नावही लोकप्रिय असल्याने नाटकांना तुुफान गर्दी व्हायची. धनवटे रंगमंदिराशी जुळलो असल्याने त्यांच्याशी संबंध आला आणि त्यांची काही नाटके मी पाहिली. आता सर्वच नाटकांची नावे आठवत नाहीत पण पं. जगन्नाथ, दुरितांचे तिमिर जाओ, शाब्बास बिरबल ही त्यांची नाटके नागपूर - विदर्भात फारच गाजली. त्यांची नाट्यप्रयोगाआधी आणि प्रयोग सुरू असताना शिस्त कमालीची चोख होती. त्यांच्या शिस्तीमुळे कुणीही कलावंत नाट्यप्रयोगादरम्यान केवळ नाटकातच गुंतलेला असायचा. मुंबई मराठी साहित्य संघाने त्यांच्या नाट्यगृहात झालेल्या सर्व संगीत नाटकांचे रेकॉर्डिंग केले आहे. हा सारा महत्त्वाचा दस्तावेज मुंबईच्या साहित्य संघाकडे आहे, अशी आठवण विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष मनोहर म्हैसाळकर यांनी सांगितली. म्हैसाळकर म्हणाले, पत्नी माधवी हिचा संशोधनाचा विषय नांदी होता. भालचंद्र पेंढारकर यांचे नाट्यविषयक ज्ञान वादातीतच होते. त्यामुळे नांदीबाबतची माहिती घेण्यासाठी आम्ही त्यांना भेटायला गेलो होतो. त्यावेळी त्यांनी जुन्या नाटकांपासून आता नव्या नाटकांपर्यंत नांदीचे स्वरूप कसे बदलले हे प्रात्यक्षिकासह सांगितले होते. नागपुरात आनंदाश्रम, शुक्रवार तलावाच्या काठावरचे वझलवार यांचे हॉटेल येेथे नाटकादरम्यान त्यांचा निवास असायचा. पायलट पब्लिसिटीतर्फे त्यांचे प्रयोग आयोजित होत असत, असे म्हैसाळकर म्हणाले. बाबासाहेब उत्तरवार म्हणाले, त्या काळात त्यांची नाटके नागपुरात तुफान चालायची. ही नाटके आमच्या पिढीने पाहिली आहेत. त्यांच्या अभिनयाने ती पिढी भारली होती. विशेषत: नाटकानंतर काही नागपूरकरांच्या आग्रखातर अनौपचारिक नाट्यसंगीताची मैफिल त्यावेळी रंगायची. पण आता ते दिवस गेले. पेंढारकरांच्या निधनाने एक मोठा कलावंत हरवला, असे ते म्हणाले.