नवी दिल्ली : उत्तम पंतप्रधान होण्यासाठी आवश्यक असलेले सर्व गुण काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे आहेत, असे प्रतिपादन ज्येष्ठ काँग्रेस नेते व खासदार शशी थरूर यांनी रविवारी केले. मात्र, पंतप्रधानपदाच्या उमेदवाराचा निर्णय सन २०१९ च्या लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर काँग्रेस आणि मित्रपक्ष सामूहिकपणे करतील, यावर त्यांनी भर दिला.‘पीटीआय’ वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. ते म्हणाले की, अनेक वेळा चर्चा व संवाद केल्यानंतर मला राहुल गांधी अगदी जवळून जे जाणवले त्यावरून व्यक्तिश: मला असे वाटते की, देशाचा एक उत्तम पंतप्रधान होण्यासाठी लागणारे सर्व गुण त्यांच्याकडे आहेत. समावेशी नेतृत्व, मतभेदांच्या पलीकडे जाऊन माणसे जोडण्याची मानसिकता, समाजातील दुर्बल घटकांविषयी कणव, देशाच्या बहुढंगी स्वरूपाशी असलेली बांधिलकी, विनम्रता, कमालीची जागरूकता आणि या सर्वांच्या जोडीला असलेला खास करिश्मा या राहुलजींच्या गुणांचा थरूर यांनी खासकरून उल्लेख केला. शिवाय काँग्रेसेतर नेत्यांनी केलेली ताजी वक्तव्ये पाहता राहुल गांधी हे त्या पदासाठी योग्य असल्याची वाढती खात्री इतर पक्षांना वाटत असल्याचे दिसते. तीन हिंदीभाषी राज्यांच्या विधानसभा काँग्रेसने जिंकल्याने विरोधकांच्या महाआघाडीचे गणित बदलेल का, असे विचारता थरूर म्हणाले की, याविषयी लगेच काही सांगता येणार नाही; पण ताजे निकाल हे काँग्रेससाठी शुभसंकेत आहेत, हे नक्की. भाजपाच्या भूलथापांना आम्ही आता विटलो आहोत. काँग्रेसलाही साथ देण्याची आमची तयारी आहे, असे संकेत मतदारांनी दिले आहेत.आघाडीच्या केंद्रस्थानी काँग्रेसचथरूर म्हणाले की, संपूर्ण देशव्यापी असा जनाधार असलेला काँग्रेस हा एकमेव पर्यायी पक्ष आहे, ही गोष्ट विधानसभा निवडणुकांवरून स्पष्ट झाली. त्यामुळे विरोधी पक्षांची देशपातळीवर आघाडी तयार करायची झाल्यास काँग्रेसच त्याच्या केंद्रस्थानी असेल, हे साहजिक आहे.राहुल गांधी हे आमचे नेते आहेत. त्यामुळे काँग्रेसला बहुमत मिळाले, तर ते पंतप्रधान होतील, हे उघड आहे. मात्र, काँग्रेसला आघाडीचे सरकार स्थापन करावे लागले, तर आघाडीतील इतर पक्षांच्या सहमतीनेच पंतप्रधानपदाचा उमेदवार ठरविला जाईल.
उत्तम पंतप्रधान होण्यासाठी राहुल गांधींकडे सर्व गुण, थरूर यांचे प्रतिपादन
By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2018 5:53 AM