- सुरेश भुसारी नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर अयोध्येत राम मंदिर बांधण्यासाठी देशातील सर्व धर्मांतील लोकांनी एकत्र यावे व राष्ट्रीय एकात्मता तसेच विविधतेचा नवा अध्याय सुरू करावा, अशी भावना ज्येष्ठ नेते डॉ. मुरली मनोहर जोशी यांनी व्यक्त केली. राम मंदिराच्या आंदोलनाचे डॉ. मुरली मनोहर जोशी नेते होते. ‘लोकमत’च्या मुलाखतीत ते म्हणाले, देशातील एका मोठ्या आंदोलनाची सांगता या निर्णयाने झाल्याचा आनंद आहे. हे आंदोलन भाजपचे नव्हते. भाजपची स्थापना होण्यापूर्वीपासून राम मंदिरासाठी आंदोलन सुरू होते.अनेकांचे या आंदोलनात योगदान होते. त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची ही वेळ आहे. या आंदोलनात भाजप सहभागी होता. परंतु आंदोलनाचे नेतृत्व धार्मिक संघटनांनी केले. या निकालाकडे हिंदू व मुस्लिमांचा प्रश्न म्हणून पाहू नये, असे आवाहन करून ते म्हणाले, श्रीराम हे केवळ हिंदूंचे नाहीत, साऱ्या जगामध्ये श्रीरामाची आराधना व प्रार्थना केली जाते. शीख, जैन, बौद्ध या धर्मांतही श्रीरामाला स्थान आहे. महाकवी इक्बालनेही श्रीरामाला इमाम-ए-हिंद मानले होते. त्यामुळे श्रीरामाला एका धर्मात बांधून ठेवणे योग्य नाही. न्यायालयाने मुस्लीम समाजाला ५ एकर जागा देण्यात यावी, असे म्हटले आहे. यावरही कुणी आक्षेप घेऊ नये. न्यायालयाने भारतीय पुरातत्त्व विभागाने दिलेले पुरावेही मान्य केले आहेत. त्यामुळे कुणी यात संशय घेण्याचा काही प्रश्नच नाही. मंदिर बांधण्यासाठी जी काही व्यवस्था न्यायालयाने दिली आहे त्यानुसार बांधकाम सुरू व्हावे, असेही त्यांनी सांगितले. या निकालाबद्दल सुन्नी वक्फ बोर्डाने नाराजी व्यक्त केल्याचे सांगताच डॉ. जोशी म्हणाले, काही मतभेद राहू शकतात. सर्व निर्णय सर्वांना मान्य होतीलच, असे नाही. परंतु माझ्या मते सर्वोच्च न्यायालयाने न्याय्य निकाल दिला आहे. सर्व बाजूंना न्यायालयाने लक्षात घेतले आहे.>याचे सारे श्रेय अडवाणी यांनासांप्रदायिक सौहार्द कायम ठेवून आम्हाला राम मंदिराकडून रामराज्याकडे जायला हवे. या आंदोलनात लाखो कार्यकर्त्यांनी बलिदान दिले आहे. आंदोलनाच्या नेतृत्वासाठी मी अशोक सिंघल व लालकृष्ण अडवाणी यांना श्रेय देतो. सिंघल हे विहिंपचे दीर्घकाळ राष्टÑीय अध्यक्ष होते व राममंदिर आंदोलनातील अग्रणींपैकी एक होते.- गोविंदाचार्य, संघाचे नेते
राम मंदिर बांधण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे - मुरली मनोहर जोशी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2019 4:22 AM