ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 6 - एका वर्षात सर्व सिम कार्ड आधार कार्डसोबत जोडले जातील असं केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात सांगितलं आहे. देशातील 90 टक्के सिम हे प्रीपेड आहेत, त्यामुळे या सिमकार्डांना आधार कार्डसोबत जोडण्यासाठी नवी यंत्रणा आणली जाणार असल्याचंही सरकारकडून सांगण्यात आलं.
वर्षाच्या आत सिम कार्ड वापरणा-यांची ओळख पटवण्यासाठी नवे नियम बनवा असं सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला सांगितलं त्यावर उत्तर देताना सरकारी वकीलाने एका वर्षात सर्व सिम कार्ड आधार कार्डसोबत जोडले जातील असं सांगितलं.
मोबाईल सिम वापरणा-यांची ओळख , पत्ता आणि सर्व माहिती उपलब्ध व्हावी. कोणतंही सिम कार्ड विना पडताळणी दिलं जाऊ नये अशी मागणी करणारी जनहीत याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी सुरू असलेल्या सुनावणीत केंद्र सरकारने न्यायालयाला ही माहिती दिली.
मोबाईल सिम पडताळणी कशी होते अशी विचारणा मागील सुनावणीत कोर्टाने सरकारला केली होती. तसेच 2 आठवड्यात सरकारने याप्रकरणी माहिती द्यावी असं सांगितलं होतं.