जयपूर : राजस्थान विधानसभेतील बहुजन समाज पक्षाचे सर्व सहा आमदार काँग्रेसमध्ये सामील झाले असून त्यांनी आपला विधिमंडळ पक्षही सत्ताधारी पक्षात विलीन केला आहे. यामुळे काँग्रेसच्या अशोक गेहलोत सरकारचे संख्याबळ १०६ झाले आहे.बसपच्या या आमदारांनी आपल्या या निर्णयाचे अधिकृत पत्र सोमवारी मध्यरात्री विधानसभा अध्यक्ष सी. पी. जोशी यांनी दिले. आधी हे आमदार काँग्रेस सरकारला बाहेरून पाठिंबा देत होते. सरकारला अधिक स्थैर्य यावे व विकासाला गती मिळावी, यासाठी हे पक्षांतर केल्याचे या आमदारांचे म्हणणे आहे.विधानसभेत काँग्रेसला ११९ आमदारांचा पाठिंबा आहे. काँग्रेसचा मित्रपक्ष राष्ट्रीय लोक दलाचा एक तर १३ अपक्षांपैकी १२ आमदारांचा मुख्यमंत्री अशोक गेहलोत सरकारला पाठिंबा आहे. बसपतून काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या सहा आमदारांमध्ये जोगिंदरसिंह आवना, दीपचंद, राजेंद्रसिंह गुढा, लखनसिंह, वाजिब अली, संदीपकुमार यांचा समावेश आहे. जोगिंदरसिंह आवना यांनी सांगितले की, राजस्थानच्या विकास व्हावा यासाठी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. हा निर्णय आम्ही एकमताने घेतला. बसप काँग्रेसला विधानसभेत पाठिंबा देतच होती, मात्र लोकसभा निवडणुकीत हा पक्ष काँग्रेसविरुद्ध लढला होता. राजस्थानातील स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामपंचायतींच्या आगामी निवडणुका आमचे कार्यकर्ते काँग्रेसच्याच झेंड्याखाली लढवतील.गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला १०० जागा मिळाल्या होत्या. ‘बसपा’च्चा सहा व राष्ट्रीय जनता दलाच्या एका आमदाराच्या पाठिंब्याने काँग्रेसने सरकार स्थापन केले होते.>काँग्रेस प्रामाणिक नाही : बसपची टीकाया आमदारांच्या पक्षांतराने काँग्रेसने आपली अविश्वासार्हता पुन्हा एकदा सिद्ध केली, अशी टीका बसपच्या प्रमुख मायावती यांनी केली. मायावतींनी टिष्ट्वटरवर लिहिले की, भाजपासारख्या कट्टर विरोधकाशी एकीने मुकाबला करण्याऐवजी मित्रपक्षातच फोडाफोड करून काँग्रेसने दगाबाजी केली. यावरून काँग्रेस मागासवर्गीयांच्या बाजूने कधीच प्रामाणिकपणे नसल्याचे दिसते.
राजस्थानात बसपचे सर्व सहा आमदार गेले काँग्रेसमध्ये
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2019 3:50 AM