कोट्टायम: गेल्या काही दिवसापासून अतिवृष्टीमुळे केरळमधील अनेक भाग पाण्याखाली गेले आहेत. काही ठिकाणी महापूर आला आहे. कोट्टायम आणि इडुक्की जिल्ह्यांच्या डोंगराळ भागात झालेल्या भूस्खलनानंतर अनेक जण बेपत्ता झाली असून, काही जणांचा मृत्यू झाला आहे. पूर परिस्थितीमुळे सखल भागात राहणाऱ्या हजारो नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. यातच आता याच कोट्टायम जिल्ह्यातील एका कुटुंबातील सर्व सहा सदस्यांनी आपला जीव गमावला. महापूर आणि भूस्खलनामध्ये या सहा जणांनी आपले प्राण गमावले असून, यामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
केरळमधील कोट्टायम जिल्ह्यातील कवली गावातील रहिवासी असलेल्या एका संपूर्ण कुटुंबाचा महापूर आणि भूस्खलनात करुण अंत झाला. सोमवारी सायंकाळी कवली सेंट मेरी चर्चमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. बिशप मार जोसेफ कलरंगट्ट यांनी लोकांच्या आणि केरळ मंत्रिमंडळातील मंत्री आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले.
हे ठिकाण भूस्खलनामुळे खूप प्रभावित
कुटुंबप्रमुख मार्टिन, त्यांची पत्नी सिनी, त्यांच्या मुली स्नेहा, सोना आणि सँड्रा आणि त्यांची आजी क्लारम्मा त्यांच्या जिल्ह्यात झालेल्या पूर आणि भूस्खलनामध्ये मृत्यू पावल्या. त्यांचे कुटुंब कावली येथील एका चर्चजवळ राहत होते. हे ठिकाण भूस्खलनामुळे खूप प्रभावित झाले असून, कुट्टिकल, कोट्टायममधील ठिकाणांपैकी एक होते. मार्टिन कुटुंबाव्यतिरिक्त, त्यांच्या शेजाऱ्यांची घरेही रहिवाशांसह वाहून गेल्याचे सांगितले जात आहे. भूस्खलनामुळे, शहराचा बराचशा भागाचा संपर्क तुटला आहे.
दरम्यान, केरळमध्ये निसर्गान थैमान घातले आहे. इथे मुसळधार पावसानंतर पुन्हा एकदा भूस्खलनाच्या घटना सुरु झाल्या आहेत. केरळमध्ये शनिवारपासून मुसळधार पावसामुळे आलेल्या पूर आणि भूस्खलनामुळे किमान २४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परिस्थितीला सामोरे मदत देऊ केली आहे. दुसरीकडे केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी पावसामुळे राज्यातील बिघडलेली परिस्थिती पाहता तातडीची बैठक बोलावली. लष्कर, नौदल आणि हवाई दलाची मदत घेतली जात आहे. जिल्ह्यांमध्ये मदत शिबिरे सुरू करण्यात आली आहेत. राज्य सरकार सर्व धरणांच्या पाण्याच्या पातळीवर लक्ष ठेवत असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.