नवी दिल्ली- स्विस बँकेतील भारतीयांच्या रकमेत 50 टक्क्यांनी वाढ झाल्यानंतर विरोधकांनी भाजपावर टीका करण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेसनं या मुद्द्यावर भाजपाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला असता, जेटली भाजपाच्या बचावासाठी पुढे सरसावले आहेत. स्विस बँकेमध्ये जमा असलेला सगळाच पैसा हा काळा नाही. परदेशात जे भारतीय वास्तव्याला आहेत, त्यांचे स्विस बँकेत खाते आहे. त्यामुळे त्यांच्या संपूर्ण पैशाला काळा पैसा म्हणू शकत नाही, असंही जेटलींनी स्पष्ट केलं आहे.काँग्रेसकडून कारण नसताना हा मुद्दा उपस्थित केला जात असल्याचा आरोपही जेटलींनी केला आहे. ते म्हणाले, स्विस बँकांमध्ये काळा पैसा ठेवणा-या लोकांना कठोरातील कठोर शिक्षा भोगावी लागणार आहे. स्वित्झर्लंड सरकारने रिअल टाईम डेटा देण्यास सुरुवात झाल्यानंतर कोणकोणत्या भारतीयांचा स्विस बँकेत काळा पैसा आहे हे स्पष्ट होईल, तोपर्यंत आम्हाला वाट पाहावी लागणार आहे.सुरुवातीला स्विस बँक भारतीयांच्या सर्व पैशाची माहिती देण्यास तयार नव्हते. परंतु जागतिक स्तरावरून दबाव वाढल्यानंतर स्विस बँकेनं तशी माहिती देण्यास तयारी दर्शवली आहे. 2019ला स्विस बँकेतल्या काळा पैशा धारकांची माहिती मिळणार असून, मूळचे भारतीय असलेल्या परदेशी पासपोर्टधारकांचे स्विस बँकेत पैसे आहेत, असंही जेटली म्हणाले आहेत.
तत्पूर्वी हंगामी अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी सरकारची बाजू मांडताना स्विस बँकेतील या ठेवींबाबत काळा पैसा किंवा अवैध देवाण-घेवाणीचा निष्कर्ष काढणे चुकीचे असल्याचे मत मांडले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली स्वित्झर्लंडसोबत जो करार झाला आहे. त्यानुसार स्वित्झर्लंडचे आर्थिक वर्ष संपल्यानंतर तेथील भारतीयांच्या ठेवींबाबत सगळी माहिती आम्हाला मिळेल. मोदींनी 100 दिवसांत 80 लाख कोटीं रुपये एवढा काळा पैसा भारतात परत आणण्याचे आश्वासन दिले होते. मात्र प्रत्यक्षात स्वीस बँकेतील काळा पैसा 50 टक्क्यांनी वाढून 7 हजार कोटींवर पोहोलचला आहे, अशी टीका काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी म्हटले आहे.