ऑनलाइन लोकमत -
जम्मू, दि. २३ - 'महिला सक्षमीकरण व्हावं असं खरच वाटत असेल तर सर्व मंदिरे महिलांसाठी खुली करावीत', असं मत जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी मांडलं आहे. उत्तरप्रदेशमधील वृंदावनमध्ये विधवा महिलांनी जुनी परंपरा मोडीत काढत मंदिरात होळी साजरी केल्याच्या पार्श्वभुमीवर ते बोलत होते.
'महिलांसाठी मंदिरे खुली होत आहेत ही खुप चांगली गोष्ट आहे. त्या या देशाचाच भाग आहेत आणि जर तुम्हा सक्षमीकरण हवं असेल तर सर्व मंदिरे महिलांसाठी खुली करावीत', असं फारुख अब्दुल्ला बोलले आहेत. 'हे होत आहे याचा आपल्या सर्वांना अभिमान वाटला पाहिजे. भारत सकारात्मक पद्धतीने पुढची वाटचाल करत आहे ही चांगली गोष्ट आहे', असं फारुख अब्दुल्लांनी म्हंटलं आहे.
ब्रुसेल्स हल्ल्यावर बोलताना जगाने दहशतवाद धोका असल्याचं मान्य केलं आहे. जेव्हा आपण त्यांना सांगत होतो तेव्हा त्यांनी विश्वास नाही ठेवला. आज तेच शब्द त्यांच्या कानात वाजत असतील असं म्हंटल आहे. या जगाला दहशतवाद्यांपासून धोका आहे आणि दहशतवादाला कोणताही धर्म नसतो. त्याला फक्त आपलं लक्ष टार्गेट करुन स्फोट करायचा असतो. आपण सर्वांनी एकत्र येऊन दहशतवादाशी लढण्याची गरज असल्याचं फारुख अब्दुल्ला बोलले आहेत.