मालवणजवळ राजकोट येथे उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा कोसळून झालेल्या दुर्घटनेमुळे महाराष्ट्रभरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, या दुर्घटनेवरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. अपघाताने आलेल्या सरकारचं सगळं कामकाजच अपघाती आहे, अशी टीका त्यांनी केली आहे. तसेच महाराष्ट्राच्या नशिबात हे महाविनाशी सरकार आले हाच महाराष्ट्रातील जनतेसाठी मोठा अपघात आहे. ज्यातून या राज्याला सावरायला खूप वेळ जाईल, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
या संदर्भात एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये विजय वडेट्टीवार म्हणाले की, अपघाताने आलेल्या सरकारचं सगळं कामकाजच अपघाती आहे. बदलापूर प्रकरण अपघात होता. समृध्दी महामार्गावर लोकांचे जीव गेले अपघात होता. नांदेड मधील शासकीय रुग्णालयात लोकं मेली अपघात होता. ठाणे शासकीय रुग्णालयात लहान बालके मेली तो अपघात होता. महाराष्ट्रभर ड्रग्स चा सुळसुळाट सुरू आहे तो एक अपघात आहे. ललित पाटील पळाला तो अपघात होता.रोज महाराष्ट्रात महिलांवर अत्याचार होत आहे ते सुद्धा अपघाताने सुरू आहे. असे एक ना अनेक अपघात महाराष्ट्रात सुरू आहेत, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.
ते पुढे म्हणाले की, तीन ड्रायव्हर आणि एक स्टिअरिंग असल्यावर स्टिअरिंग हातात घेण्यासाठी, मीच किती मोठा जनतेचा रखवाला हे दाखवण्यासाठी या तिघांची जी धडपड सुरू आहे त्यामुळेच हे सगळे अपघात घडताहेत, असा आरोपही वडेट्टीवार यांनी केला.