ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि.17- राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीमध्ये आपले नाव असल्याची चर्चा म्हणजे निव्वळ अफवा असल्याचे सांगत परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी आज स्पष्ट केले. केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह आणि व्यंकय्या नायडू यांनी कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि भाकपाचे नेते सीताराम येचुरी यांची भेट घेतल्यानंतर याबाबतच्या चर्चांना उधाण आले होते. या भेटीमध्ये कॉंग्रेसचे लोकसभेतील गटनेते मल्लिकार्जुन खर्गे आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद हे देखिल उपस्थित होते. भाजपाने कोणतेही नाव चर्चेत जाहीर केले नसल्यामुळे सहमतीचा प्रश्नच येत नाही असे आझाद यांनी बैठकीबाबत बोलताना सांगितले.
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा कार्यकाळ 14 जुलै रोजी संपत असून नव्या राष्ट्रपतींसाठी 17 जुलै रोजी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस 28 जून असून 1 जुलैपर्यंत अर्ज मागे घेण्यास अवधी असेल. सत्ताधारी भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि विरोधकांनी आतापर्यंत कोणाचेही नाव उमेदवारीसाठी जाहीर केलेले नाही. यामुळे भावी राष्ट्रपतींबाबत विविध नावांची चर्चा सुरु झाली आहे. लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन, झारखंडच्या राज्यपाल द्रौपदी मुर्मु, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उद्योगपती रतन टाटा यांच्यासह अनेक नावांची याबाबत शक्यता वर्तवण्यात येत आहे. गेले दोन दिवस मेट्रोमॅन म्हणून ओळखले जाणारे ई. श्रीधरन यांचेही नाव पुढे येत होते मात्र श्रीधरन यांनीही स्वतःच अशी कोणतीही शक्यता नसल्याचे स्पष्ट केले. शिवसेनेने राष्ट्रपतीपदासाठी यापुर्वीच रा .स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचे नाव पुढे केले होते, तर त्यानंतर डॉ.स्वामीनाथन यांना आपली पसंती असल्याचे स्पष्ट केले. मात्र अद्याप सरकारतर्फे कोणाचेही नाव जाहीर करण्यात आलेले नाही.
भाजपातर्फे उभ्या केल्या जाणाऱ्या उमेदवाराला आपला पाठिंबा असेल तामिळनाडूतील सत्ताधारी अण्णाद्रमुक पक्षाने जाहीर केले आहे. "एम.जी. रामचंद्रन आणि पक्षाच्या दिवंगत नेत्या जयललिता यांचे केंद्राशी नेहमीच सौहार्दपुर्ण संबंध राहिले आहेत. जयललिता नेहमीच कॉंग्रेसच्या विरोधात मतदान करत आल्या होत्या, त्यामुळे त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत आम्ही राष्ट्रपती निवडणुकीत भाजपाच्या बरोबर जाण्याचा निर्णय घेतला आहे." असे अण्णाद्रमुकचे नेते आणि लोकसभेचे उपसभापती तंबी दुराई यांनी पाठिंब्याबाबत बोलताना सांगितले. अण्णाद्रमुकसह वायएसआर कॉंग्रेसनेही रालोआच्या उमेदवाराला आपला पाठिंबा जाहीर केला आहे.