Haryana Assembly Elections 2024 : हरियाणातील विधानसभा निवडणुकीची तारीख जशी जवळ येईल, तसं राजकीय वातावरण तापले आहे. काँग्रेसमधील अंतर्गत कलह वाढत आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये अनेक ज्येष्ठ नेते मुख्यमंत्रीपदासाठी दावा करत आहेत. यादरम्यान अनेक नेत्यांच्या नाराजीचीही माहिती समोर येत आहे.
काँग्रेसचे प्रमुख नेते हरियाणात प्रचारात व्यस्त आहेत. निवडणुकीच्या प्रचारासोबतच काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपदासाठीही ज्येष्ठ नेत्यांमध्ये लढाई सुरू आहे. दरम्यान, काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी मोठे वक्तव्य केले आहे. आम्हा तिघांनाही मुख्यमंत्री व्हायचे आहे, पण कोणाला मुख्यमंत्री करायचे, हे हायकमांडच ठरवेल, असे रणदीप सुरजेवाला यांनी म्हटले आहे.
हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुड्डा, कुमारी सैलजा आणि मी म्हणजे रणदीप सुरजेवाला किंवा अन्य कोणीही मुख्यमंत्री होऊ शकतात. मुख्यमंत्री होण्याची इच्छा आम्हा तिघांमध्येही आहे. आम्ही फक्त आमची इच्छा व्यक्त करू शकतो, निर्णय हायकमांडला घ्यायचा आहे, असे रणदीप सुरजेवाला यांनी सांगितले.
काँग्रेसची सत्ता आल्यास शंभू बॉर्डर खुली करू - हुडाहरियाणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष सत्तेवर आल्यास शेतकऱ्यांसाठी शंभू बॉर्डर खुली केली जाईल, असे काँग्रेस नेते भूपेंद्र सिंह हुडा यांनी सोमवारी सांगितले. दरम्यान, पिकांसाठी किमान आधारभूत किंमत (MSP) च्या कायदेशीर हमीसह आपल्या विविधी मागण्यांसाठी सरकारवर दबाव आणण्यासाठी संयुक्त किसान मोर्चा (गैर-राजकीय) आणि किसान मजदूर मोर्चा शेतकऱ्यांच्या दिल्ली चलो मोर्चाचे नेतृत्व करत आहेत.
५ ऑक्टोबर रोजी मतदान ९० सदस्यीय हरियाणा विधानसभेसाठी ५ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. ८ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. सर्वच पक्षांनी निवडणुकीचा प्रचार सुरू केला आहे. यावेळी काँग्रेसने महिला कुस्तीपटू विनेश फोगोट यांनाही उमेदवार केले आहे.