नवी दिल्ली : सर्व व्यवहारांतील आवश्यक बाबी जाहीर केल्या आहेत, असे प्रतिपादन टाटा उद्योग समूहातील टाटा स्टील आणि इंडियन हॉटेल्स या कंपन्यांनी गुरुवारी केले. टाटा सन्सचे पदच्यूत चेअरमन सायरस मिस्त्री यांनी बुधवारी केलेल्या आरोपांबाबत हे स्पष्टीकरण केले आहे.चुकीच्या व्यवहारांमुळे टाटा स्टील आणि इंडियन हॉटेल्स या कंपन्यांना १८ अब्ज डॉलरवर बुडीत खाती टाकावे लागतील असा आरोप मिस्त्री यांनी केला होता. या पार्श्वभूमीवर दोन्ही कंपन्यांनी मुंबई शेअर बाजारात निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, कंपन्यांचे सर्व व्यवहार तसेच कंपनीच्या मालमत्तांचे मूल्य लेखाविषयक मानकांच्या कसोट्यांनुसारच नियमितपणे तपासलेले आहेत. सायरस मिस्त्री यांनी केलेल्या आरोपाच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजाराने टाटा उद्योग समूहातील टाटा स्टील, टाटा पॉवर यांसह अन्य काही कंपन्यांकडून स्पष्टीकरण मागितले होते. इंडियन हॉटेल्सच्या निवेदनात म्हटले की, लेखा परीक्षक समितीने आमचे वित्तीय विवरण तयार केले आहे. चेअरमन आणि संचालक मंडळाने त्याला मंजुरी दिलेली आहे. कंपनीकडे जाहीर करण्याजोगे सध्यातरी काहीही नाही.मिस्त्री यांनी हकालपट्टीनंतर कंपनीच्या संचालक मंडळ सदस्यांना पाठविलेल्या इ-मेलमध्ये अनेक आरोप केले होते. त्यांनी म्हटले होते की, रतन टाटांकडून चेअरमन पदाचा कार्यभार स्वीकारला तेव्हा समूहाच्या पाच कंपन्या तोट्यात होत्या. समूह कर्जाच्या ओझ्याखाली दबून गेला होता. इंडियन हॉटेल्स, टाटा मोटर्स, टाटा स्टीलचा ब्रिटनमधील प्रकल्प, नॅनो प्रकल्प, समूहाची ऊर्जा शाखघ, आणि दूरसंचार शाखा यांची नावे त्यांनी घेतली होती. (लोकमत न्यूज नेटवर्क)
सर्व व्यवहार आधीच जाहीर केले आहेत
By admin | Published: October 28, 2016 1:44 AM