उदयपूर : रामाचे काम करायचे आहे आणि सर्वांना मिळूनच करायचे आहे. कारण सर्वांमध्ये राम आहे. सर्व जण आत्माराम आहेत. रामाचे काम होईलच, अशा सूचक शब्दांत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी अयोध्येतील राम मंदिराविषयी वक्तव्य केले. त्यांचे हे वक्तव्य म्हणजे सरकार स्थापन होण्याआधी दिलेली ‘जय श्रीराम’ची घोषणा असल्याचे मानले जाते.प्रताप गौरव केंद्र येथे ९ मंदिरांच्या भक्तिधाम लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते. याच कार्यक्रमात संत मोरारी बापू म्हणाले की, रामाचे नाव घेऊन खूप झाले. आता रामाची सेवा करायची आहे. राम या देशाची संस्कृती आहे. रामाचे काम म्हणजे राष्ट्राचे काम आहे. लोकांनी रामाचे नाव घ्यावे आणि रामाचे काम करण्याचा संकल्पसुद्धा करावा. लोकसभा निवडणुकांमधील भाजपच्या ऐतिहासिक विजयानंतर भागवत यांच्या उपस्थितीत पहिला धार्मिक कार्यक्रम झाला. मोरारी बापू यांच्या सूचक वक्तव्यानंतर भागवत म्हणाले की, पूजा झाली आहे. आता सेवा शिल्लक आहे. जोशपूर्ण असे एक काम झाले. आता खरे काम सुरू होईल.सरसंघचालक म्हणाले की, लोक जागरूक, शांततापूर्ण, कृतिशील आणि कणखर असतील तर देशाचे भवितव्य उज्ज्वल राहते, असे इतिहासाने आपल्याला सांगितले आहे. आता आपण सर्वांनी जागरूक राहिले पाहिजे. रामाचे काम करायचे आहे. आपले काम आपण स्वत: केले तर योग्य असते. मात्र दुसऱ्याला ते सोपविले, तर देखरेख करावी लागते. हे काम म्हणजे कोणत्या पक्षाचे धोरण असू शकत नाही. ज्या गोष्टीची आपण दीर्घकाळ प्रतीक्षा करत आहोत, त्यासाठी आपण काम केले पाहिजे. आपले उद्दिष्ट गाठण्यासाठी काम करणाºया संस्थेच्या भलेपणासाठी आपण काम करण्याची गरज आहे.न्यायालयात विषय प्रलंबितराम मंदिराचे बांधकाम हे भाजपचे दीर्घकालीन आश्वासन राहिले आहे. पक्षाच्या २०१४ व २०१९ च्या जाहीरनाम्यातही त्याचा उल्लेख आहे. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील ‘एनडीए’ सरकारने कोर्टाच्या निर्णयानुसार हा विषय हाताळण्याचे ठरविले आहे. सुप्रीम कोर्टात हा विषय प्रलंबित आहे. (वृत्तसंस्था)
रामाचे काम सर्वांनी मिळून करायचे आहे- सरसंघचालक मोहन भागवत
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2019 4:27 AM