नवी दिल्ली - देश सध्या कोरोना महामारीच्या संकटाचा सामना करत आहे. याच दरम्यान अनेक मन हेलावून टाकणाऱ्या घटना समोर येत आहे. अशीच एक धक्कादायक घटना केरळमध्ये घडली आहे. "तुम्ही सर्वांनी माझ्या आईवडिलांचा जीव घेतला आणि आता अंत्यसंस्कारही करू देत नाहीत" असं म्हणणाऱ्या एका मुलाचा व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. या घटनेने सर्वत्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. राहुल राज असं या 23 वर्षीय मुलाचं नाव असून त्याचा मन सुन्न करणारा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. राहुलच्या आईवडिलांचा पेटवून घेतल्यानंतर मृत्यू झाला आहे.
केरळमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. पोलीस घराबाहेर काढत असल्याने घाबरलेल्या एका दाम्पत्याने स्वतःला पेटवून घेतल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये दाम्पत्याचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांच्या मुलाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. "तुम्ही सर्वांनी माझ्या आईवडिलांचा जीव घेतला आहे. आता मी त्यांचे अंत्यसंस्कारही करू शकत नाही का?" असं व्हिडीओमध्ये राहुलने म्हटलं आहे. व्हिडीओमध्ये राहुल मृतदेह दफन करण्यासाठी जमीन खोदताना दिसत आहे. त्यावेळी उपस्थित असलेले पोलीस त्याला रोखण्याचा प्रयत्न करत आहेत. तर काही जण शांतपणे हे दृश्य पाहत असल्याचं व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तिरुअनंतपुरम जिल्ह्यातील अथियानोर पंचायत येथील राहुलच्या आईवडिलांनी 22 डिसेंबर रोजी स्वत:ला पेटवून घेतले. राहुलचे वडिलांनी यांनी गावात 1300 स्क्वेअर फूट जागेवर घर बांधले होते. न्यायालयाने ही जागा बेकायदेशीररित्या बळकावल्याचा निर्णय दिला होता. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिसांनी या दाम्पत्याला घराबाहेर काढण्यास सुरुवात केली. त्यावेळी त्यांनी स्वत:ला चुकून पेटवून घेतले. यामध्ये गंभीररित्या भाजलेल्या दाम्पत्याचा मृत्यू झाला आहे. राहुलच्या वडिलांनी जबाबात पोलिसांना दूर ठेवण्यासाठी मी लायटर पेटवला होता. माझी आत्महत्या करण्याची कोणतीही इच्छा नव्हती असं म्हटलं आहे. तसेच एका पोलीस अधिकाऱ्याने लाईटर फटका मारल्याने आमच्यावर पडल्याने आग लागल्याचं देखील सांगितलं आहे.
केरळच्या पोलीस महासंचालकांनी याप्रकरणी दाम्पत्याच्या मृत्यूची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. राहुलने देखील घडलेल्या प्रकारावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. "पोलीस 22 डिसेंबर रोजी पोलीस आमच्या घरी पोहचले. वडिलांनी स्थानिक मुन्सिफ न्यायालयाकडून हद्दपार करण्याच्या आदेशावर स्थगिती मिळविली होती. मात्र वडिलांना या आदेशाची प्रत मिळाली नव्हती. पोलिसांनी न्यायालयाच्या आदेशानुसार वडिलांना सर्व वस्तू घेऊन आमच्या घराबाहेर पडायला सांगितले" असं म्हटलं आहे. वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर राहुलने त्यांना दफन करण्यासाठी खड्डा खोदण्यास सुरुवात केली. मात्र पोलिसांनी त्याला यासाठी विरोध केला. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.