ज्ञानवापी व्यास तळघरातील पूजा सुरु राहणार; अलाहाबाद हायकोर्टाने याचिका फेटाळली
By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2024 11:20 AM2024-02-26T11:20:53+5:302024-02-26T11:21:34+5:30
Gyanvapi Case: ज्ञानवापी व्यास तळघरातील पूजा स्थगित करण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका हायकोर्टाने फेटाळून लावली.
Gyanvapi Case: ज्ञानवापी परिसरात असलेल्या व्यास तळघरात हिंदूना पूजा करण्याचा अधिकार देण्याचा महत्त्वपूर्ण निकाल वाराणसी जिल्हा न्यायालयाने दिला होता. मात्र, मुस्लिम पक्षकारांनी याविरोधात अलाहाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर उच्च न्यायालयात सुनावणी झाली. या सुनावणीत मुस्लिम पक्षकारांनी केलेली याचिका फेटाळण्यात आली आहे. त्यामुळे ज्ञानवापी व्यास तळघरातील पूजा सुरूच राहणार असल्याचे सांगितले जात आहे.
ज्ञानवापी व्यास तळघरात सुरू झालेली पूजा तसेच वाराणसी जिल्हा न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर आक्षेप घेत मुस्लिम पक्षकारांनी अलाहाबाद उच्च न्यायालयात धाव घेतली. हिंदू पक्ष आणि मुस्लिम पक्षाची बाजू ऐकून घेतल्यानंतर आपला निर्णय सुरक्षित ठेवला होता. वाराणसी न्यायालयाच्या आदेशाला अंजुमन व्यवस्था समितीने आव्हान दिले होते. तसेच व्यास तळघरातील पूजेला स्थगिती द्यावी, अशी याचिका केली होती.
ज्ञानवापी व्यास तळघरातील पूजा सुरूच राहणार
उच्च न्यायालयाने यासंदर्भात सुनावणी घेत, मुस्लिम पक्षकारांची याचिका फेटाळत असल्याचे सांगत व्यास तळघरातील पूजा सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तत्पूर्वी, वाराणसी जिल्हा न्यायाधीश अजय कृष्ण विश्वेश यांनी पूजा करण्याची जबाबदारी काशी विश्वनाथ ट्रस्टकडे दिली. जिल्हा न्यायाधीशांच्या निर्णयानंतर लगेचच ज्ञानवापी व्यास तळघरात पूजा सुरू करण्यात आली. तसेच तिथे देवतांची स्थापना करून आरत्यांचे वेळापत्रक लागू करण्यात आले. लाखो भाविकांनी याचे दर्शन घेतल्याची माहिती देण्यात आली आहे.
दरम्यान, ज्ञानवापीतील व्यास तळघरात गणपती, श्रीविष्णू यांच्या एक, तर हनुमंतांच्या दोन, जोशीमठ येथील दोन प्रतिमांची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. तर राम नाम लिहिलेली एक वीट स्थापन करण्यात आली आहे. एक मकर आणि एक अखंड ज्योत स्थापन करण्यात आली आहे. याशिवाय दिवसातून पाच वेळा आरतीही केली जात आहे. काशी विश्वनाथ मंदिराचे मुख्य पुजारी ओम प्रकाश मिश्रा आणि अयोध्येतील रामललाच्या अभिषेकासाठी शुभ मुहूर्त ठरवणारे गणेश्वर द्रविड यांनी व्यास तळघरात पहिली पूजा केली.