लखनऊ: देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. नव्या कोरोनाबाधितांची संख्या काही अंशी घटताना दिसत असली, तरी कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या चिंता वाढवणारी आहे. कोरोनाच्या उद्रेकामुळे आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण येत असून, कोरोना लस, ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शन, बेड्स यांचा तुटवडा जाणवत आहे. अशातच देशातील विविध न्यायालयांमध्ये कोरोनासंदर्भात याचिका दाखल करण्यात आल्या असून, अलाहाबाद उच्च न्यायालयाने योगी सरकारला चांगलेच फटकारले आहे. उत्तर प्रदेशमधील आरोग्य व्यवस्था राम भरोसे असल्याचे स्पष्ट मत न्यायालयाने नोंदवले आहे. (allahabad high court slams yogi govt over corona situation in uttar pradesh)
अलाहाबाद उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या एका जनहित याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने योगी सरकारला धारेवर धरले. न्या. अजित कुमार आणि न्या. सिद्धार्थ वर्मा यांच्या खंडपीठासमोर झालेल्या सुनावणीवेळी न्यायालयाने योगी सरकारला पाच सूचना केल्या आहेत. उत्तर प्रदेशातील छोटी शहरे आणि ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था राम भरोसे असल्याचे सांगत योगी सरकारला फटकारले.
उच्च न्यायालयाने केल्या ५ सूचना
अलाहाबाद उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीवेळी न्यायालयाने योगी सरकारला कोरोनाच्या परिस्थितीत लढण्यासाठी ५ सूचनावजा सल्ले दिले आहेत. एक म्हणजे बड्या औद्योगिक घराण्यांकडून करण्यात येणाऱ्या दानाची रक्कम वा फंड कोरोनाची लस खरेदीसाठी वापरावा. दुसरे म्हणजे बीएचयू वाराणसीसह गोरखपूर, प्रयागराज, आग्रा, मेरठ येथील ४ मोठ्या वैद्यकीय महाविद्यालयातील सुविधा वाढवाव्यात. २२ मेपर्यंत याचा अपग्रेडेशन प्लान न्यायालयाला सादर करावा, असे निर्देश न्यायालयाने दिले.
योगी आदित्यनाथ मैदानात; १० दिवसांत ११ ठिकाणी दौरे, परिस्थितीचा घेतला आढावा
नर्सिंग होमच्या सुविधा वाढवाव्यात
तिसरे म्हणजे छोट्या शहरात २० रुग्णवाहिका, प्रत्येक गावात आयसीयू सुविधा असलेल्या २ रुग्णवाहिका तैनात कराव्यात. तसेच नर्सिंग होमच्या सुविधा वाढवण्यात याव्यात. तेथील बेड्सचे वर्गीकरण करावे. शेवटची सूचना म्हणजे ३० बेड्स असणाऱ्या नर्सिंग होममध्ये ऑक्सिजन उत्पादन करणाऱ्या प्रकल्पाची उभारणी करावी, अशा ५ सूचनावजा सल्ले न्यायालयाने योगी सरकारला दिले आहेत.
दरम्यान, देशात गेल्या २४ तासात २,६३,५३३ नवीन कोरोना रुग्ण आढळले. तर ४,२२,४३६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच ४,३२९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या भारतात ३३,५३,७६५ रुग्णांवर उपचार सुरू आहे. तसेच १८ कोटी ४४ लाख ५३ हजार १४९ जणांना कोरोनाची लस देण्यात आली आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.