सध्या सर्वत्र दुर्गापूजेचा उत्साह पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी यानिमित्त जत्रेचं आयोजन करण्यात येत आहे. जत्रेत मुलांसाठी अनेक प्रकारची खेळणी, फुगे उपलब्ध आहेत. लहान मुलांना फुग्यांसोबत खेळायला खूप आवडतं. तसेच रंगीबेरंगी फुगे मुलांना आकर्षित करतात. पालकही मुलांना फुगे खरेदी करून देतात. पण प्रयागराजमध्ये याच फुग्याने एका तीन वर्षांच्या मुलीचा जीव घेतला आहे.
एका मुलीचा फुग्यामुळे मृत्यू झाला. ही मुलगी तिच्या आईसोबत आजी-आजोबांकडे आली होती, असं सांगितलं जात आहे. तिच्या आजोबांनी नातीला खेळता यावं यासाठी एक फुगा विकत घेतला. पण तोच फुगा मुलीच्या जीवावर बेतला आहे. खेळत असताना अचानक फुगा फुटला. यानंतर लगेचच मुलगी खाली पडली आणि तिच्या तोंडातून फेस येऊ लागला. मुलीला डॉक्टरकडे नेलं असता तिचा मृत्यू झाला होता.
प्रयागराजच्या नवाबगंज पोलीस ठाण्यातील इमामगंजमधील फतुहां गावात ही घटना घडली आहे. येथे राहणाऱ्या इम्रान अहमद यांची पत्नी नाज तीन वर्षांची मुलगी सायरासोबत तिच्या आई-वडिलांकडे घरी गेली होती. तिथे आजोबांनी सायराला फुगा आणला. यानंतर घरातील सदस्य आपापल्या कामात व्यस्त होते. सायरा फुग्यांसोबत खेळू लागली. अचानक घरातील सदस्यांना फुगा फुटल्याचा आवाज आला. सायरा तिथेच खाली पडली आणि तिच्या तोंडातून फेस येऊ लागला. कुटुंबीयांनी मुलीला घेऊन तातडीने डॉक्टरांकडे धाव घेतली. मात्र डॉक्टरांनी सायराला मृत घोषित केलं.
'हे' आहे मृत्यूचं कारण
मुलीच्या मृत्यूचं डॉक्टरांनी दिलेलं कारण पाहून सर्वांनाच आश्चर्याचा मोठा धक्का बसला आहे. सायरा तोंडाने फुगा फोडण्याचा प्रयत्न करत होती. जेव्हा फुगा फुटला तेव्हा त्याचा एक तुकडा सायराच्या श्वासनलिकेत अडकला. यामुळे तिचा मृत्यू झाला. या प्रकरणानंतर मोतीलाल नेहरू मेडिकल कॉलेजच्या ईएनटी विभागाचे प्रमुख डॉ.सचिन म्हणाले की, अशी अनेक प्रकरणं समोर येतात. आपल्या मुलांसाठी फुगे किती धोकादायक असू शकतात याची लोकांना जाणीव नाही.