नवी दिल्ली - अलाहाबाद केंद्रीय विद्यापीठाच्या (Allahabad Central University) कुलगुरू प्रा. संगीता श्रीवास्तव (Vice Chancellor Prof Sangeeta Srivastava) यांनी अजानमुळे झोपेत अडथळा निर्माण होतो अशी तक्रार केली आहे. त्यांनी याबाबत थेट जिल्हाधिकारी भानू चंद्र गोस्वामी यांना पत्र लिहिलं आहे. यामध्ये श्रीवास्तव यांनी नियमानुसार कारवाई करण्याची मागणी केली आहे. गायक सोनू निगम (Singer Sonu Nigam) यांनी देखील काही वर्षांपूर्वी मशिदीमध्ये पहाटे होणाऱ्या अजानमुळे झोप मोड होते अशी तक्रार केली होती. यानंतर वाद निर्माण झाला होता.
कुलगुरू प्रा. संगीता श्रीवास्तव यांनी या पत्रामध्ये "रोज सकाळी साधारण साडे पाच वाजता अजान होते. लाऊड स्पीकरवरुन होणाऱ्या अजानमुळे झोपमोड होते. त्यानंतर अनेक प्रयत्न करुनही झोप येत नाही. त्यामुळे दिवसभर डोकेदुखीचा त्रास होतो. याचा परिणाम रोजच्या कामकाजावरही होत आहे" असं म्हटलं आहे. तसेच "जिथं माझे नाक सुरु होते, तिथं तुमचे स्वातंत्र्य संपते" ही जुनी म्हण देखील सांगण्यात आली आहे. आपण कोणताही संप्रदाय किंवा जातीच्या विरोधात नाही. तुम्ही अजान लाऊड स्पीकरशिवाय देखील करू शकता. त्यामुळे दुसऱ्यांची दिनचर्या प्रभावित होणार नाही" असंही म्हटलं आहे.
"आगामी ईदपूर्वी सहरीची घोषणा पहाटे 4 पूर्वी होईल. त्यामुळे त्यांच्या आणि इतरांच्या त्रासामध्ये भर पडेल. भारतीय राज्यघटनेत सर्व पंथनिरपेक्ष आणि शांततापूर्ण सौहार्दाची संकल्पना मांडण्यात आली आहे" याचा उल्लेख देखील या पत्रात करण्यात आला आहे. त्याचबरोबर अलाहाबाद हायकोर्टाच्या जुन्या आदेशाचा दाखलाही यामध्ये श्रीवास्तव यांनी दिला आहे. श्रीवास्तव यांनी या पत्राची प्रत कमिशनर, आयजी आणि डीआयजी यांनाही पाठवली आहे.
श्रीवास्तव यांच्याकडून काही दिवसांपूर्वी पत्र मिळाल्याची माहिती डीआयजी सर्वश्रेष्ठ त्रिपाठी यांनी दिला आहे. तसेच त्यांनी या विषयावर अधिकाऱ्यांना चौकशी करुन कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर जिल्हाधिकारी भानू चंद्र गोस्वामी यांनी देखील या विषयावर नियमानुसार कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. कुलगुरूंनी लिहिलेल्या पत्रामुळे नवा वाद निर्माण होऊ शकतो. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.