लखनऊ- पंतप्रधान आवास योजनेला आज तीन वर्षं पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्तानं लखनऊमध्ये एका आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सहभाग घेतला होता. यावेळी मोदींनी विकासाच्या योजना जनतेला सांगतानाच विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. विशेष म्हणजे पंतप्रधानांनी नाव न घेता काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींवरही निशाणा साधला आहे.मी चौकीदार नसून भागीदार असल्याचा माझ्यावर काही जणांनी आरोप केला आहे. हा आरोप म्हणजे माझ्यासाठी बक्षीसच आहे. कारण देशाच्या विकासात मी भागीदार आहे. मला गर्व आहे की, घाम गाळणारे मजूर, दुःखी मातेचा मी भागीदार आहे.मी सियाचीनच्या जवानांचा आणि देशातील शेतक-यांचा भागीदार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी राफेल घोटाळ्यावरून राहुल गांधींनी मोदी चौकीदार नव्हे, तर भागीदार असल्याचा आरोप केला होता. त्याला मोदींनी प्रत्युत्तर दिलं आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अटल बिहारी वाजपेयींच्या आठवणींनाही उजाळा दिला.विविध योजनांच्या माध्यमांतून तीन वर्षांत झालेला शहरी विकासाचीही मोदींनी जनतेला माहिती दिली. ही योजना पुढे चालू ठेवण्यासाठी मी योगी सरकारचा आभारी आहे. यापूर्वीच्या सरकारला प्रत्येक वेळी पत्र लिहावं लागत होतं. परंतु काही लोक कामच करू इच्छित नव्हते. त्यांना फक्त त्यांच्या बंगल्याची सजावट करायची होती. त्यातून त्यांना वेळच मिळत नव्हता, असं म्हणत मोदींनी यापूर्वीच्या अखिलेश सरकारवरही हल्लाबोल केला.2022पूर्वी देशातील प्रत्येक नागरिकाकडे स्वतःचे घर असावे, यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. सरकारने शहरांमध्ये आतापर्यंत 54 लाख घरं, तर ग्रामीण भागातील जनतेच्या 1 कोटींपेक्षा अधिक घरांना मंजुरी दिली आहे. कोट्यवधी जनतेचे भवितव्य सुरक्षित बनवण्याचा आमचा संकल्प आहे आणि तो तीन वर्षांनंतर बळकट झाला आहे. पंतप्रधान आवास योजनेंतर्गत माता-भगिनींच्या नावावर घरे दिली जात आहेत. या योजनेंतर्गत आतापर्यंत जवळपास 87 लाख घरांची नोंदणी महिलांच्या नावावर करण्यात आली आहे.