ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 17 - अण्णाद्रमुकचे निवडणूक चिन्ह मिळवण्यासाठी निवडणूक आयोगाला लाच देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप टीटीव्ही दिनाकरन याने फेटाळून लावला आहे. दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने दीनाकरन विरोधात निवडणूक आयोगाला लाच देण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. मी कुठल्याही मध्यस्थाबरोबर चर्चा केलेली नाही किंवा कोणालाही लाच दिलेली नाही. मला समन्स मिळाले तर, मी कायदेशीर खटला लढेन असे बंगळुरुला शशिकला यांना भेटण्यासाठी निघालेल्या दिनाकरन यांनी सांगितले.
सुकेश चंद्रशेखर यांच्याबरोबर मी कुठलीही चर्चा केली नाही दिनाकरन यांनी सांगितले. दिनाकरन शशिकला यांचा भाचा आहे. सुकेश चंद्रशेखर याने निवडणूक आयोगात आपली ओळख असून निवडणूक चिन्ह मिळवून देतो असे दिनाकरन यांना सांगितले होते. त्यासाठी काही कोटी रुपये देण्याचे ठरले होते. दिल्लीतील एका हॉटेलमध्ये सुकेशल 1 कोटीच्या रोख रक्कमेसह अटक करण्यात आली. त्यावेळी त्याने चौकशीत दिनाकरनकडून हे पैसे घेतल्याचे सांगितेल.
तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या निधनानंतर त्यांच्या आरके नगर विधानसभा मतदारसंघात होणारी पोटनिवडणूक रद्द झाली. या मतदारसंघातून दिनाकरऩ अण्णाद्रमुकचे उमेदवार होते. पण इथेही मतदारांना लाच देण्याचा प्रयत्न झाल्याने निवडणूकच आयोगाने निवडणूकच रद्द केली.
जयललिता यांच्या निधनानंतर अण्णाद्रमुक पक्ष दोन गटांमध्ये विभागला आहे. एक पनीरसेल्वम तर दुसरा शशिकला यांना मानणारा गट आहे. दोघांनी अण्णाद्रमुकच्या अधिकृत निवडणूक चिन्हावर दावा सांगितल्याने निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना वेगवेगळे निवडणूक चिन्ह दिले.