ऑनलाइन लोकमत
बंगळुरु, दि. ४ - आयटी सिटी बंगळुरुमध्ये टांझानियन तरुणीला मारहाण करुन तिला विवस्त्र केल्याच्या आरोपांवरून बंगळुर पोलिसांनी आतापर्यंत पाचजणांना अटक केली आहे. केंद्र आणि राज्य सरकारने या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. रविवारी रात्री ही घटना घडली होती. दरम्यान, कर्नाटकचे गृहमंत्री जी. परमेश्वर यांनी या तरुणीला विवस्त्र करण्यात आले नव्हते असे म्हटले आहे.
एका सुदानी व्यक्तिने भरधाव गाडी चालवून एका महिलेला चिरडले होते. ही घटना घडली त्यासुमारास त्या रस्त्यावर सदर टांझानियाची मुलगी व तिचे सहकारी एका गाडीने जात होते. त्यावेळी जमावाने त्यांची कार थांबवली. तरुणी आणि तिच्यासोबत असलेल्या तरुणांना जमावाने कारमधून बाहेर काढून बेदम मारहाण केली नंतर तरुणीला विवस्त्र केले. हे प्रकरण तापल्यानंतर राज्य सरकारने कारवाईचे पाऊल उचलले आहे.
जमावाने भररस्त्यात टांझानियन तरुणीला मारहाण करुन तिला विवस्त्र केले होते. या कृत्यामध्ये सहभागी असलेल्या दोषींना कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी टांझानियाच्या भारतातील उच्चायुक्तांनी केली आहे. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी कर्नाटक सरकारकडे स्पष्टीकरण मागितले असून, तात्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. कर्नाटकमध्ये काँग्रेसचे सरकार आहे.
विवस्त्र परेड काढल्याचे वृत्त चुकीचं - मंत्री
प्रथमदर्शी अहवालावरून टांझानियाच्या विद्यार्थिनीची विवस्त्रावस्थेत परेड काढल्याचे वृत्त चुकीचे असल्याचे कर्नाटकचे गृहमंत्री जी. परमेश्वर यांनी म्हटले आहे. याप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे आणि परराष्ट्र खात्याला या संदर्भातील माहिती राज्य सरकारने दिल्याचेही ते म्हणाले.
बेंगळूरमध्ये १२ हजार विदेशी विद्यार्थी शिक्षण घेतात आणि त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी राज्य सरकारची असल्याचेही परमेश्वर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.