मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आपल्यावर पाळत ठेवल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केला आहे. यामुळे महाविकास आघाडीमध्ये खळबळ उडाली असून राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी पटोलेंना प्रत्युत्तर दिलं आहे. पटोले माहितीअभावी बोलत आहेत. त्यांच्या पक्षात अनेक माजी मुख्यमंत्री आहेत. त्यांच्याकडून सविस्तर माहिती घेऊन पटोलेंनी बोलावं, असं मलिक पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले.
'एखाद्या पक्षाच्या महत्त्वाच्या कार्यक्रमांची, त्या पक्षातील महत्त्वाच्या नेत्यांच्या, मंत्र्यांच्या दौऱ्यांची माहिती पोलीस दलातील एक विशेष विभाग ठेवतो. सुरक्षेसाठी ही माहिती ठेवली जाते. त्यात नवीन काहीच नाही. नाना पटोले माहितीअभावी बोलत आहेत. त्यांनी माहिती घेऊन बोलावं,' असा टोला मलिक यांनी लगावला. 'नाना पटोलेंच्या पक्षात अनेक माजी मुख्यमंत्री आहेत. अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे यांना कार्यपद्धतीची कल्पना आहे. पटोलेंनी त्यांच्याकडून माहिती घ्यावी आणि बोलावं,' असा सल्लादेखील त्यांनी दिला.
'महत्त्वाच्या नेत्यांचे, मंत्र्यांचे कार्यक्रम, त्यांचे दौरे यांची नोंद पोलीस दलातील एक विशेष विभाग ठेवतो. यामध्ये सगळ्याच पक्षाच्या नेत्यांचा समावेश असतो. काँग्रेस, शिवसेना, भाजप नेत्यांच्या कार्यक्रमांची, आंदोलनाचा तपशीलदेखील संबंधित विभाग ठेवतो. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून ही माहिती ठेवली जाते. नाना पटोलेंना, काँग्रेसच्या मंत्र्यांना पोलीस सुरक्षा नको असेल, तर मग तसं त्यांनी स्पष्टपणे गृह मंत्रालयाला सांगावं. त्यानुसार गृह मंत्रालयाला योग्य तो निर्णय घेता येईल,' असं मलिक म्हणाले.
काय म्हणाले नाना पटोले?नाना पटोले यांनी लोणावळ्यामध्ये कार्यकर्त्यांच्या एका सभेत केलेल्या एका विधानानं खळबळ माजली आहे. महाराष्ट्रात काँग्रेस उभी राहत आहे. आयबीचा, पोलिसांचा रिपोर्ट रोजच्या रोज सकाळी ९ वाजता मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांच्या बंगल्यावर नेऊन दिला जात आहे. आताही मी कुठे आहे, राज्यात कुठे कुठे काय सुरु आहे, कुठे आंदोलन होत आहे याची माहिती त्यांना पोहोचवली जात आहे. मी स्वबळाचा नारा दिल्याने त्यांच्या पायाखालची वाळू सरकू लागल्याने त्यांनी आपल्यावर पाळत ठेवल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला आहे. आपण त्यांच्यासोबत सरकारमध्ये आहोत, परंतू त्यांच्याकडे मुख्यमंत्री पद, गृहमंत्री, उपमुख्यमंत्री पदे आहेत. यामुळे त्यांच्याकडून असे यापुढेही होणार आहे, असे पटोले म्हणाले. मी रात्री ३ वाजता दौऱ्यावर निघालो ते देखील त्यांना तेव्हाच माहिती होते, असा आरोप त्यांनी केला आहे.