मोदींच्या कारकीर्दीत सीबीआयचे स्वत:शीच युद्ध, राहुल गांधी यांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2018 04:58 AM2018-10-23T04:58:34+5:302018-10-23T04:58:46+5:30
मोदी सरकारकडून राजकीय सूड उगविण्यासाठी सीबीआयचा हत्यार म्हणून वापर केला जात आहे. पण आता या संस्थेची रया जाण्याची वेळ आली आहे.
नवी दिल्ली : मोदी सरकारकडून राजकीय सूड उगविण्यासाठी सीबीआयचा हत्यार म्हणून वापर केला जात आहे. पण आता या संस्थेची रया जाण्याची वेळ आली आहे. सीबीआयचे स्वत:शीच युद्ध सुरू आहे, असा आरोप काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी सोमवारी केला.
सीबीआयचे विशेष संचालक राकेश अस्थाना यांच्याविरोधात एका लाच प्रकरणात सीबीआयनेच गुन्हा नोंदविला आहे. त्याचा संदर्भ देऊन राहुल गांधी यांनी एका टिष्ट्वटमध्ये म्हटले आहे की, पंतप्रधानांचे लाडके तसेच गुजरात केडरमधील आणि गोध्रा विशेष तपास पथकात कामगिरी बजावलेले अधिकारी अशी राकेश अस्थाना यांची ओळख आहे. सीबीआयमध्ये संचालकांनंतर त्या संस्थेतील दुसऱ्या क्रमांकाची महत्त्वाची व्यक्ती म्हणूनही त्यांच्याकडे पाहिले जात होते. अशा व्यक्तीवरच आता गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सीबीआयच्या विशेष संचालकपदी अस्थाना यांची नियुक्ती केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींवर राहुल गांधींनी कठोर टीका केली होती. बीफ निर्यात करणारा व्यापारी मोईन कुरेशी हा मनी लाँड्रिंगच्या एका प्रकरणात गुंतला आहे. त्यातून सुटका करण्यासाठी त्याच्याकडून दोन कोटी रुपयांची लाच अस्थाना यांनी घेतल्याचा आरोप आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात सीबीआयने १५ आॅक्टोबर रोजी गुन्हा नोंदविला.
>अंतर्गत स्पर्धेतून तर कारवाई झाली नाही ना?
सीबीआयच्या अधिकाºयांमधील अंतर्गत स्पर्धेमुळे अस्थानांवर कारवाई झाली नाही ना, असाही संशय अनेकांनी बोलून दाखविला आहे. गुजरातमध्ये नरेंद्र मोदी मुख्यमंत्री असताना पोलीस अधिकारी असलेल्या अस्थानांची त्यांच्याशी विशेष जवळीक होती. गोध्रासारख्या संवेदनशील प्रकरणाच्या विशेष तपास पथकात असलेल्या अस्थाना यांनी बजावलेल्या कामगिरीवर त्यावेळी मोदी अतिशय खुश होते. मग आताच नेमके असे काय झाले की त्यांच्यावर कारवाईची कुºहाड उगारण्यात आली याची चर्चा सर्वत्र सुरू आहे.