ऑनलाइन लोकमत -
नवी दिल्ली, दि. २८ - हरियाणामधून दिल्लीला पाणी पुरवठा होणा-या काही परिसरांत पाण्यामध्ये विष मिसळले असल्याचा आरोप दिल्लीचे पाणीपुरवठा मंत्री कपिल शर्मा यांनी केला आहे. पाणी विषारी असल्या कारणाने पाण्यातील अमोनिया स्तर वाढला आहे. ज्यामुळे २ महत्वाचे वॉटर प्लांट बंद करण्यात आले आहेत.
गेले २ महिने अमोनिया स्तर वाढला असल्याने आम्हाला अनेक वेळा वॉटर प्लांट बंद ठेवावे लागले आहेत. वझिराबाद, चंद्रावल आणि ओखलामधील प्लांट बंद करण्यात आले आहेत. पाणीपुरवठा करणा-या मुख्य मुनक कालव्याची जाट आंदोलनादरम्यान तोडफोड करण्यात आली आहे. दिल्लीला याअगोदर कधीच अशाप्रकारे पाणी समस्येला सामोरे जावं लागलं नसल्याचं कपील शर्मा यांनी सांगितलं आहे.
दिल्ली सरकारने अमोनिया स्तर कमी करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला मात्र स्तर वाढतच चालला आहे. ज्यामुळे वझिराबाद आणि चंद्रावलमधील प्लांट बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागल्याची माहिती कपील शर्मा यांनी दिली आहे. अमोनिया सापडल्याचे आमच्याकडे पुरावे असल्याचंही कपील शर्मा यांनी सांगितलं आहे. यामुळे दिल्लीतील ३५ ते ४० लाख लोकांना पाणीपुरवठा होत नाही आहे. तसंच जोपर्यंत वझिराबाद आणि चंद्रावल वॉटर प्लांट सुरु होत नाहीत मध्य आणि उत्तर दिल्लीलादेखील पाणीपुरवठा करणं शक्य नसल्याची माहिती कपिल शर्मा यांनी दिली आहे.