ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 1 - सायरस मिस्त्री आणि टाटा समुहामधील आरोप प्रत्यारोपांचे सत्र नव्याने सुरू झाले आहे. जपानी कंपनी डोकोमोसोबत झालेल्या विवाद योग्य पद्धतीने न हाताळल्याचे आपल्यावर करण्यात येत असलेले आरोप हे खोटे आणि निराधार असल्याचे टाटाच्या चेअरमनपदावरून दूर करण्यात आलेल्या सायरस मिस्त्री यांनी म्हटले आहे.
सायरस मिस्त्रींवर डोकोमो प्रकरणात मिस्त्रींवर करण्यात आलेल्या आरोपांना करण्यात आलेल्या मिस्त्री यांच्या कार्यालयाकडून मंगळवारी सविस्तर प्रत्त्युत्तर देण्यात आले. डोकोमो व्यवहाराबाबतचे सर्व निर्णय हे टाटा आणि सन्सच्या संचालक मंडळाच्या मंजुरीनंतर सामुहिकपणे घेण्यात आले होते, असे मिस्त्री यांनी कार्यालयाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे.
मिस्त्री म्हणाले, "डोकोमो प्रकरण हाताळताना टाटाची संस्कृती आणि मूल्यांच्या आधारावर निर्णय न घेतल्याचा माझ्यावर होत असलेला आरोप खोटा आणि निराधार आहेत. " डोकोमो खटला ज्यापद्धतीने लढवण्यात आला. त्याला टाटा आणि ट्रस्टची संमती मिळाली नसती असे मानणे चुकीचे ठरेल, असेही मिस्त्री यांनी सांगितले.
टाटाची सहयोगी कंपनी आणि जपानी कंपनी एनटीटी डोकोमो यांच्यात 2009 साली करार झाला होता. या करारानुसार डोकोमोने टाटामधील शेअर खरेदी केले होते. जपानी कंपनी तीन वर्षांनंतर आपले समभाग टाटाला किंवा शेअर बाजारात विकू शकतात, अशी तरतूद या करारात होती. मात्र त्यानंतर दोन्ही कंपन्यांमध्ये विवाद झाला. तसेच डोकोमोने टाटाविरोधात आंतरराष्ट्रीय लवादासमोर दावा दाखल केला. ज्याचा निकाल डोकोमोच्या बाजूने लागला.