नवी दिल्ली : भारतीय कुस्ती महासंघाचे (डब्ल्यूएफआय) अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांच्यावरील लैंगिक आरोपांप्रकरणी गुन्हा न नोंदविल्याचा आरोप करणाऱ्या सात महिला कुस्तीपटूंच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी दिल्ली सरकार आणि इतरांना नोटीस बजावली. हे गंभीर आरोप आहेत आणि त्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे, असे न्यायालयाने म्हटले.
ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर थेट सुनावणी घेण्याचा निर्णय न्यायालयाने घेतला. चौकशी समितीचे निष्कर्ष जाहीर करावे, यासाठी कुस्तीपटू जंतरमंतर येथे निदर्शने करीत आहेत. खंडपीठाने विचारले, काय आरोप आहेत?
काय आरोप आहेत? असा प्रश्न खंडपीठाने केला. त्यावर कपिल सिब्बल म्हणाले की, अशा स्वरूपाच्या गुन्ह्यात गुन्हा न नोंदविल्याबद्दल पोलिस कर्मचाऱ्यांवरही कारवाई केली जाऊ शकते. याची दखल घेत खंडपीठाने म्हटले की, कुस्तीपटूंनी याचिकेत गंभीर आरोप केले आहेत. न्यायालयाने या प्रकरणात लक्ष घालण्याची गरज आहे. याचिकाकर्त्यांची ओळख उघड करू नये. नोटीस जारी केली आहे. शुक्रवारपर्यंत उत्तर दाखल करावे.