लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : २८ मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीत संसदेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन करणार आहेत. त्याला राहुल गांधींसह विरोधी पक्षांनी विरोध केला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संसदेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन करावे, पंतप्रधानांनी नाही, असे राहुल गांधी यांनी ट्विटर हँडलवर लिहिले आहे.
सर्व विरोधी पक्ष आणि काँग्रेसने नवीन इमारतीच्या उद्घाटनाच्या तारखेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. काँग्रेसने म्हटले की, २८ मे ही हिंदुत्ववादी विचारवंत विनायक दामोदर सावरकर यांची जयंती आहे, त्यामुळे या दिवशी नवीन संसद भवनाचे उद्घाटन करणे हा राष्ट्रनिर्मात्यांचा अपमान आहे.
१८ मे रोजी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी पंतप्रधानांना नवीन इमारतीच्या उद्घाटनासाठी आमंत्रित केले होते. मात्र, त्यानंतर विरोधकांनी त्यावर टीका करण्यास सुरुवात केली आहे. लोकसभा सचिवालयाने संसद भवनावर तयार केलेल्या पुस्तिकेनुसार, नवीन संसद भवनाच्या लोकसभेच्या कक्षेत ८८८ सदस्यांची आसनव्यवस्था असेल आणि राज्यसभेत ३८४ सदस्य बसू शकतील. संयुक्त अधिवेशनादरम्यान सभागृहात १,२७२ सदस्यांची बसण्याची व्यवस्था असेल. पंतप्रधानांनी १० डिसेंबर २०२० रोजी संसदेच्या नवीन इमारतीची पायाभरणी केली होती.
संसदेची नवी इमारत पंतप्रधान मोदींचा ‘वैयक्तिक व्हॅनिटी प्रोजेक्ट’ आहे. २८ मे रोजी ते उद्घाटन करणार असलेल्या नवीन संसदेच्या इमारतीचे एकमेव आर्किटेक्ट, डिझायनर आणि कार्यकर्ता हे मोदीच आहेत. आमच्या सर्व राष्ट्रनिर्मात्यांचा अनादर आहे. गांधी, नेहरू, पटेल, बोस इत्यादींना पूर्णपणे नाकारले आहे. डॉ. आंबेडकरांचा तीव्र अपमान करण्यात येत आहे.- जयराम रमेश, काँग्रेसचे सरचिटणीस