नवी दिल्ली : दिल्लीत विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. आप, भाजप, काँग्रेस असे सर्वच पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. काँग्रेसनेही आप आणि अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजय माकन यांनी आपचे प्रमुख आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना देशद्रोही ठरवले आहे. यासोबतच अजय माकन यांनी असेही म्हटले आहे की, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत आपसोबत आघाडी करणे ही काँग्रेसची चूक होती, जी आता सुधारण्याची गरज आहे.
दिल्ली काँग्रेसने बुधवारी आप सरकारविरोधात श्वेतपत्रिका जारी केली आहे. यावेळी, दिल्लीतील काँग्रेस कमकुवत होण्याचे आणि दिल्लीच्या दुर्दशेचे प्रमुख कारण म्हणजे १० वर्षांपूर्वी केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील पहिल्या सरकारला काँग्रेसने दिलेला पाठिंबा होता, असे अजय माकन म्हणाले. दरम्यान, हे आपले वैयक्तिक मत असल्याचेही अजय माकन यांनी स्पष्ट केले.
अजय माकन यांनी बुधवारी अरविंद केजरीवाल यांच्या निवडणूक घोषणांवरही निशाणा साधला. ते म्हणाले, केजरीवाल यांची एका शब्दात व्याख्या करायची झाली तर ते म्हणजे 'फर्जीवाल' (फसवे) आहे. त्यांच्या घोषणा केवळ फसव्या आहेत, दुसरे काही नाही. तसेच, केजरीवाल यांनी दिलेल्या घोषणांची कामे पंजाबमध्ये करून दाखवावीत, कारण तिथे लेफ्टनंट गव्हर्नर सुद्धा नाहीत. केजरीवाल खोटी आश्वासने देऊन जनतेची दिशाभूल करत आहेत का? असा सवाल अजय माकन यांनी केला.
केजरीवाल देशद्रोही आहेत - अजय माकनलोकसभा निवडणुकीत पुन्हा आपसोबत आघाडी करून चूक झाल्याचे अजय माकन यांनी आपले मत व्यक्त केले आहे. ही चूक सुधारणे गरजेचे आहे. केजरीवाल यांच्यासारख्या व्यक्तीवर विश्वास ठेवता येणार नाही. केजरीवाल यांची विचारधारा नाही आणि विचारही नाही. आपल्या राजकीय महत्त्वाकांक्षेसाठी ते कोणत्याही थराला जाऊ शकतात. केजरीवाल हे देशद्रोही आहेत, त्यांच्या वैयक्तिक महत्त्वाकांक्षेशिवाय त्यांची कोणतीही विचारधारा नाही, असे अजय माकन म्हणाले.