BJP alliance with JDS, Karnataka: कर्नाटकात JDS आणि भाजपा यांच्यातील युतीवर शिक्कामोर्तब झाले आहे. पण कर्नाटकातील काही JDS नेत्यांना भाजपसोबतची युती पसंत नसल्याचे दिसते. याच संदर्भात महत्त्वाची बाब म्हणजे आणखी एका अल्पसंख्याक नेत्याने पक्ष सोडला आहे. कर्नाटकात पक्षाचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या तुमकुरू जिल्ह्यातील जेडीएस उपाध्यक्षांनी भाजपसोबतच्या युतीच्या निषेधार्थ बुधवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. पक्षाचे प्रमुख अल्पसंख्याक नेते एस. शफी अहमद यांनी माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा आणि माजी मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी यांना व्हॉट्सअपवर राजीनामा पत्र पाठवले.
पक्ष सदस्य, उपाध्यक्ष पदाचा राजीनामा
आपल्या राजीनाम्यात अहमद यांनी म्हटले आहे की, मी JD(S) पक्षाचा आणि उपाध्यक्ष पदाचा तत्काळ प्रभावाने राजीनामा देत आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेस पक्ष सोडला आणि जेडीएसमध्ये प्रवेश केला. मात्र त्याच्या पुढील वाटचालीबाबत सध्या तरी स्पष्टता नाही. लोकसभा निवडणुकीपूर्वी पक्षाने भाजपशी हातमिळवणी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर JD(S) पक्षाच्या अल्पसंख्याक नेत्यांनी बैठक घेतली. दरम्यान, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सी.एम. इब्राहिम यांनी अद्याप या घडामोडीवर भाष्य केलेले नाही, परंतु सूत्रांनी दावा केला आहे की ते देखील पक्ष सोडण्याच्या विचारात आहेत.
जनता दल (धर्मनिरपेक्ष) कर्नाटक युनिटचे उपाध्यक्ष सय्यद शफीउल्ला यांनी गेल्या शनिवारी भाजपा पक्षासोबतच्या युतीबद्दल नाराजी व्यक्त करत पक्षाचा राजीनामा दिला होता. 'भावी रणनीती'बाबत त्यांनी पक्षाच्या इतर मुस्लिम नेत्यांच्याही बैठका घेतल्या आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, JD(S) चा राज्यातील मुस्लिम समुदायावर बऱ्यापैकी प्रभाव आहे.
अनेक प्रसंगी मुस्लिम बांधवांनी काँग्रेसपेक्षा जेडीएसला निवडले आहे. मात्र, ही युती मुस्लिम समाजाला धक्का असल्याचे बोलले जात आहे. पक्षाचा जनाधार कमी होण्याची शक्यता आहे, असे काही राजकीय निरीक्षकांचे म्हणणे आहे. शफिउल्ला यांनी आपल्या राजीनामा पत्रात म्हटले आहे की, "मी हे सांगू इच्छितो की मी समाज आणि समुदायाची सेवा करण्यासाठी कठोर परिश्रम केले आहेत आणि पक्षाची सेवा केली आहे, कारण आमचा पक्ष धर्मनिरपेक्षतेवर विश्वास ठेवत होता आणि त्यांच्या पाठीशी उभा राहिला होता.'
'इतर कोणताही पर्याय शिल्लक नाही'
ते म्हणाले की मी हे देखील नमूद करू इच्छितो की ज्या कालावधीत आमच्या पक्षाचे राज्य युनिट भाजपसोबत राज्य सरकार स्थापन करण्यासाठी सामील झाले त्या कालावधीसाठी मी पक्षाबाहेर राहण्याचा निर्णय घेतला होता. पक्षाचे वरिष्ठ नेते आता भाजपशी हातमिळवणी करण्याचा निर्णय घेत असल्याने पक्षाच्या प्रदेश वरिष्ठ उपाध्यक्ष पदाचा आणि पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देण्याशिवाय माझ्याकडे पर्याय उरला नाही.