योग गुरू बाबा रामदेव आणि इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) यांच्यातील वाद काही शमण्याची चिन्हं नाहीत. कारण बाबा रामदेव यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा वादा आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत जाऊन पोहोचला आहे. 'आयएमए'कडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहीण्यात आलं असून यात बाबा रामदेव यांनी अॅलोपॅथी आणि डॉक्टरांबाबत केलेल्या वक्तव्याचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे. याशिवाय बाबा रामदेव यांच्यावर तातडीनं कारवाई करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे. त्यामुळे आता पंतप्रधान मोदी याप्रकरणावर काय भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
"पंतप्रधान नरेंद्र मोदी एका बाजूला नागरिकांना कोरोना विरोधीत लस घेण्याचं आवाहन करत आहेत. तर दुसऱ्या बाजूला 'पतंजलि'चे योगगुरू बाबा रामदेव कोरोना लसीचे दोन डोस घेऊनही देशात १० हजार डॉक्टर्सचा मृत्यू झाल्याचं सांगत फिरत आहेत. इतकंच नव्हे, तर अॅलोपॅथीच्या उपचारांमुळे देशात कोरोना रुग्णांनी जीव गमावला असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. बाबा रामदेव यांचं हे विधान अतिशय दुर्दैवी आणि अशोभनीय असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यात लक्ष घालून कारवाई करावी. बाबा रामदेव लसीकरणाबाबत लोकांची दिशाभूल करण्याचं काम करत आहेत. त्यांच्यावर देशद्रोहाअंतर्ग कारवाई व्हावी", अशी मागणी 'आयएमए'कडून करण्यात आली आहे.
कोरोना प्रादुर्भावाच्या पहिल्या लाटेत देशात ७५३ तर दुसऱ्या लाटेत आतापर्यंत ५१३ डॉक्टरांनी आपला जीव गमावला आहे. बाबा रामदेव यांनी अॅलोपॅथीला मुर्ख विज्ञान ठरवून डॉक्टरांचा अपमान केला आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात कारवाई झालीच पाहिजे, अशी आक्रमक भूमिका आयएमएनं घेतली आहे.
आयएमएनं यावेळी देशातील लसीकरणाचीही माहिती पत्रातून दिली आहे. देशात आतापर्यंत २० कोटी लसीकरण झालेलं आहे आणि आयएमए लसीकरण मोहिमेला मोठ्या प्रमाणात वाढविण्यासाठी दिवसरात्र प्रयत्न करत आहे. लसीबद्दल जनतेच्या मनात असलेल्या शंका देखील दूर करण्याचं काम आयएमएनं केलं आहे, असंही पत्रात नमूद करण्यात आलं आहे.