चेन्नई - मंदिरांमध्ये पुजारी नियुक्तीमध्ये जातीआधारित वंशावळीची कोणतीही भूमिका नाही. विश्वस्तांना मंदिराच्या आवश्यकतेनुसार विविध अनुष्ठान, पूजा पद्धतीचे ज्ञान असलेल्या कोणत्याही पात्र व्यक्तीला पुजारी म्हणून नियुक्त करण्याची परवानगी आहे, असा निर्णय मद्रास उच्च न्यायालयाने दिला आहे.
हिंदू धार्मिक आणि धर्मादाय देणगी विभागाच्या जाहिरातीविरोधात मुथू सुब्रमण्यम गुरुक्कल यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एन. आनंद व्यंकटेश यांनी हा आदेश दिला. या जाहिरातीमध्ये सालेममधील श्री सुगवणेश्वर स्वामी मंदिरात पुजारी पदासाठी अर्ज मागविण्यात आले होते.
याचिकाकर्त्यांची तक्रार होती की, ही जाहिरात त्याच्या आणि इतरांच्या वंशानुगत अधिकारांचे उल्लंघन करते, याचिकाकर्त्याच्या वकिलांनी युक्तिवाद केला की, हे मंदिर एक पुरोगामी मंदिर आहे; त्यामुळे पुजारी पदावर कोणतीही नियुक्ती प्रथा आणि गरजेनुसारच केली जाऊ शकते.न्यायमूर्ती व्यंकटेश यांनी आपल्या निकालात सर्वोच्च न्यायालयाच्या विविध निकालांचा संदर्भ दिला.
वंशपरंपरागत हक्क सांगता येणार नाहीशेषमल प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावरून हे स्पष्ट झाले आहे की, पुजाऱ्यांची नियुक्ती धर्मनिरपेक्ष कार्य आहे आणि त्यामुळे वंशपरंपरागत हक्क सांगता येणार नाही. पुजारी नियुक्तीची जबाबदारी मंदिर व्यवस्थापकांना दिली जाते आणि तेच पुजारी निवडतात, असे न्यायमूर्ती व्यंकटेश यांनी निर्णय देताना स्पष्ट केले.