नवी दिल्ली : सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आलेले सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांनी गुरुवारी केंद्रीय दक्षता आयुक्त के.व्ही. चौधरी यांची भेट घेऊन भ्रष्टाचाराच्या आरोपांचा इन्कार केल्याचे कळते. सीबीआयचे विशेष संचालक राकेश अस्थाना यांनी केलेल्या लाचखोरीच्या आरोपांबाबत दक्षता आयोगाकडून त्यांची चौकशी सुरू आहे.चौकशीचा भाग म्हणून वर्मा यांनी गुरुवारी दुपारी १ वाजता चौधरी आणि दक्षता आयुक्त शरद कुमार यांची भेट घेतली. या भेटीचा कोणताही तपशील उघड करण्यात आलेला नाही. अस्थाना यांनी केलेल्या आरोपांबाबत केंद्रीय दक्षता आयोगाला (सीव्हीसी) प्रलंबित चौकशी निवृत्त न्यायाधीश न्या. ए. के. पटनाईक यांच्या देखरेखीखाली दोन आठवड्यात पूर्ण करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने २६ आॅक्टोबर रोजी दिला होता.त्यानुसार वर्मा यापूर्वीही ‘सीव्हीसी’समोर हजर झाले असून त्यांनी आपले म्हणणे मांडताना स्वत:वरील सर्व आरोपांचे खंडन केले होते. सूत्रांनुसार वर्मा यांनी आपल्या बचावाचे सविस्तर लेखी निवेदनही सादर केले. वर्मा यांनी कुरेशीचा एजंट सतीश साना याच्याकडून तीन कोटी रुपयांची लाच घेतल्याचा आरोप करणारी तक्रार अस्थाना यांनी केल्यानंतर ती ‘सीव्हीसी’कडे पाठविण्यात आली होती.अन्य अधिकाऱ्यांचीही चौकशी...सीव्हीसीने सीबीआयमधील उपनिरीक्षक ते अधीक्षक पदापर्यंतच्या अधिकाºयांना पाचारण करीत त्यांचे बयान नोंदविले आहे. मोईन कुरेशी याच्या लाच प्रकरणाचा तपास करणाºया अधिकाºयांचा त्यात समावेश आहे. आयआरसीटीसी घोटाळ्यात माजी केंद्रीय मंत्री लालूप्रसाद यादव यांचाही सहभाग असून गुरांच्या तस्करीत सहभागी बीएसएफच्या अधिकाºयाला लाचेसह रंगेहाथ पकडण्यात आले होते. या प्रकरणाच्या तपासात सहभागी अधिकाºयांना सीव्हीसीकडून पाचारण केले जात आहे.
अलोक वर्मा यांच्याकडून भ्रष्टाचाराचा इन्कार, चौकशीचा तपशील उघड करण्यास नकार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 09, 2018 3:53 AM