संजय शर्मालोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा नवी टीम तयार करणार नाहीत. ते जुन्या टीमबरोबरच २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत काम करणार आहेत. अनेक राज्यांच्या विधानसभा निवडणुका व २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकांमुळे नवी टीम तयार करण्याचा निर्णय टाळण्यात आला आहे.
नड्डा यांचा राष्ट्रीय अध्यक्षपदाचा कार्यकाळ मागील महिन्यात १७ जानेवारी रोजी वाढविण्याची घोषणा करण्यात आली, तेव्हापासून ते नव्या कार्यकाळासाठी नवीन टीमचे गठण करतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. परंतु ते जुन्या टीमबरोबरच काम करतील, हे आता निश्चित करण्यात आले आहे. हीच टीम २०२३ मधील सर्व विधानसभा निवडणुका व २०२४ मधील लोकसभा निवडणुकांची रणनीती ठरवील.
निवडणुकांबाबत आज चर्चारविवारी भाजपच्या मुख्यालयात जे. पी. नड्डा यांनी सर्व राष्ट्रीय सरचिटणीसांची बैठक बोलावली आहे. त्या कर्नाटक, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, राजस्थान, तेलंगणा, मिझोराम या सहा राज्यांत होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या स्थितीचा आढावा घेण्यात येणार आहे. त्याचबरोबर मागील लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या १६० जागांवर भाजपच्या स्थितीबाबतही चर्चा करण्यात येणार आहे.
जी-२० वर भाजपचे कार्यक्रम जी-२० संमेलनाची तयारी देशभरात मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. भाजप जी-२० देशांचे कार्यक्रम देशभरात घेऊन जाण्यासाठी कार्यक्रम तयार करीत आहे. बूथ, मंडळ, जिल्ह्यांपासून राज्यांच्या राजधानींमध्येही कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.
राष्ट्रीय सरचिटणीसांबरोबर ऐकणार मन की बात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा रविवारी आपल्या सर्व राष्ट्रीय सरचिटणीसांबरोबर भाजपच्या राष्ट्रीय मुख्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘मन की बात’ हा कार्यक्रम आकाशवाणीवर ऐकणार आहेत.