नरोडा - गुजरातमध्ये स्थानिक प्रश्न घेऊन नरोड्याच्या आमदारांच्या कार्यालयामध्ये गेलेल्या राष्ट्रवादीच्या महिला नेत्याला भर रस्त्यावर लाथा बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली होती. या प्रकारानंतर आता, भाजपाआमदार बलराम थवानी यांनी राष्ट्रवादीच्या नेत्या नीतू तेजवानी यांची जाहीरपणे माफी मागितली आहे. तसेच, नीतू या माझ्या बहिणीप्रमाणे असल्याचे सांगत बलराम यांनी नीतूकडून राखीच बांधून घेतली.
ती मला बहिणीसारखी आहे, झाल्या प्रकाराबद्दल मी तीची माफी मागतो. आमच्या दोघांमध्ये गैरसमजूतीचा प्रकार घडला होता. यापुढे तिला कुठलिही मदत लागल्यास मी सदैव तिच्या पाठिशी असल्याचे भाजपा आमदार बलराम थवानी यांनी म्हटले आहे. तसेच, थवानी यांनी रुग्णालयात जाऊन नीतू यांची भेट घेतली. यावेळी, नीतू यांच्याकडून राखीही बांधण्यात आली असून नीतू यांनीही झालं गेलं विसरून बलराम यांना राखी बांधली आहे.
रविवारी राष्ट्रवादीच्या नेत्या नीतू तेजवानी (कुबेर नगर वॉर्ड) आमदार बलराम थवानी यांच्या कार्यालयामध्ये गेल्या होत्या. त्यावेळी त्यांनी स्थानिक प्रश्नांवरून जाब विचारल्याने आमदार थवानी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी कार्यालयाबाहेर काढत लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. याचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. थवानी यांनी स्थानिक समस्या ऐकून न घेताच माझ्या कानशिलात मारले. जेव्हा मी खाली पडले तेव्हा त्यांनी लाथांनी मारायला सुरुवात केली. यानंतर माझ्या नवऱ्यालाही त्यांच्या कार्यकर्त्यांनी मारायला सुरुवात केली. मोदींनी त्यांच्याच राज्यात महिला सुरक्षित आहेत का याचे उत्तर द्यावे, असा आरोप नीतू तेजवानी यांनी केला होता. तसेच आमदार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांविरोधात तेजवानी यांनी तक्रार दाखल केली असून रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत. मात्र, बलराम यांनी राखी बांधून घेतल्यामुळे या प्रकरणावर आता पडदा पडला आहे.
दरम्यान, याप्रकरणी झोन 4 चे डीसीपी निरज बडगुजर यांनी दखल घेत कारवाई करणार असल्याचे म्हटले आहे. तसेच, दोन्ही पक्षांकडून तक्रार दाखल करण्यात आली असून चौकशी करुन योग्य ती कारवाई करू असेही बडगुजर यांनी म्हटले आहे.