नवी दिल्ली - काँग्रेस नेतृत्वाकडून पक्षात मोठे बदल करण्यात आले आहे. दिल्ली काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी अनिल चौधरी यांना नियुक्त करण्यात आले असून कर्नाटक काँग्रेसची जबाबदारी संकटमोचक म्हणून प्रसिद्ध असलेल्या डी.के. शिवकुमार यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. कर्नाटकमध्ये काँग्रेस-जनता दल धर्मनिरपेक्ष सरकार धोक्यात आले असताना शिवकुमार यांनी सरकार वाचविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती.
दिल्ली काँग्रेस कमिटीत तीन नवीन उपाध्यक्ष देण्यात आले आहेत. अभिषेक दत्त यांच्यासह जयकिशन, मुदित अग्रवाल, अली हसन आणि शिवानी चोपडा यांचा समावेश आहे. नुकत्याच झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची कामगिरी निराशाजनक झाली आहे. येथे काँग्रेसला एकाही जागेवर विजय मिळवता आला नाही. त्यानंतर दिल्ली प्रदेश काँग्रेसमध्ये मोठे बदल करण्याची मागणी करण्यात येत होती. आता नवीन नियुक्त्यांनी काँग्रेसचा दिल्लीतील जनाधार वाढविण्याची योजना नेतृत्वाकडून करण्यात आली आहे.
वरिष्ठ काँग्रेसनेते डी.के. शिवकुमार यांना प्रदेशाध्यक्षपदी नियुक्त करून काँग्रेसने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. शिवकुमार यांचे पक्षात वजन असून त्यांना पक्षसंघटन वाढविण्यासाठी त्याचा लाभ होणार आहे. तर राज्य काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदी ईश्वर खांडरे, सतीश जरकिहोली आणि सलीम अहमद यांना नियुक्त करण्यात आले आहे. दिनेश गुंडू राव याआधी प्रदेशाध्यक्ष होते.