लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशातील राजकीय वातावरण तापले आहे. लोकसभा निवडणुकीसाठी देशात आज एकूण ८८ जागांसाठी मतदान होत आहे. दरम्यान, पश्चिम बंगालमधील बालूरघाट लोकसभा मतदारसंघाचे भाजपाचे उमेदवार सुकांता मजुमदार आणि तृणमूल काँग्रेसच्या (टीएमसी) कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाल्याचे वृत्त आहे.
बालूरघाट येथील मतदान केंद्रावर मोठ्या संख्येने तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित असल्याचा आरोप मजुमदार यांनी केला आहे. याठिकाणी तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. मिळालेल्या माहितीनुसार, मतदानादरम्यान तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते आणि पश्चिम बंगाल भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सुकांत मजुमदार यांच्यात बाचाबाची झाली. दरम्यान, भाजपा नेते सुकांत मजुमदार यांना प्रत्युत्तर देताना, तृणमूल काँग्रेसने म्हटले की, आज सकाळी भाजपा-नियंत्रित केंद्रीय दलांच्या गुंडगिरीचा पर्दाफाश होताच, त्यांच्या गुंड-इन चीफने कव्हर-अप सुरू केले आहे.
दरम्यान, लोकसभेच्या पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग, बालुरघाट आणि रायगंज या तीन जागांवर मतदान होत आहे. येथे सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. निवडणूक आयोगाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, सकाळी 9 वाजेपर्यंत रायगंजमध्ये सर्वाधिक 16.46 टक्के, दार्जिलिंगमध्ये 15.74 टक्के आणि बालूरघाटमध्ये 14.74 टक्के मतदान झाले आहे. ते म्हणाले की, आतापर्यंत मतदान शांततेत झाले आहे. तसेच, 241 पैकी 43 तक्रारींचे निराकरण करण्यात आले आहे.